शिवसेना-भाजपाच्या वादात बेस्टचे नुकसान
मुंबई : बेस्टच्या भाड्यामध्ये कपात करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये मंजुरी मिळण्याच्या घटनेला १५ दिवसच उलटले असतानाही त्याचा तिकिट दर कपातीचा अजूनही फायदा मिळालेला नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बेस्टच्या तिकिट दर कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळण्यामागचे खरे कारण शिवसेना भाजपातील वाद असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.
बेस्ट समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर भाजपाकडून ‘अच्छे दिन’चे पालुपद आळविण्यातआले होते. वीज दर कमी करण्याकरता बेस्ट प्रशासनाकडून एक प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पाठविण्यात आला. बेस्ट बसच्या दरामध्ये फेरबदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला. वातानुकूलित बसेसचे दर अर्ध्यावर करण्याच्या
प्रस्तावालाही बेस्ट समितीमध्ये मंजुरी देण्यात आली असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र आजही जुन्याच दराची झळ सहन करावी लागत आहे.
बेस्टच्या वातानुकूलित बससेवा तोट्यात चालविली जात आहे. या बससुविधेकडे प्रवाशांना आकर्षित करण्याकरता दर ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव तयार करून ४ मे रोजी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला ४ मे रोजीच मंजुरी मिळाली असली तरी तिकिटाचे दर मात्र आजही कमी झालेले नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेस्टच्या वातानुकूलित बससुविधेचा प्रवाशांना लाभ घेता यावा याकरता ४ मे रोजी बेस्टच्या सभेचे आयोजन केले असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी सांगितले. हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडेही पाठविण्यात आला आहे. काही कारणास्तव हा प्रस्ताव महासभेत घेण्यात आला नाही. बेस्टच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळावी याकरता महापौरांशी चर्चा करून विशेष सभेचे आयोजन करण्याकरता त्यांना मिठबावकर यांनी पत्रही दिले आहे. परंतु सभा बोलविण्याचा व विषय घेण्याचा अधिकार महापौरांकडे असल्याने याचा निर्णय आता महापौरांवर अवलंबून आहे.
शिवसेना-भाजपाच्या वादात बस प्रबाशी भरडले जात असून बेस्ट उपक्रमाचेही नुकसान होत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या रवी राजा यांनी केला आहे. महापौर मुंबईच्या बाहेर
असल्यावर उपमहापौर मनपाची महासभा आयोजित करू शकतात. परंतु उपमहापौर भाजपाच्या आहेत. सेना-भाजपाच्या अंर्तगत वादामुळे हा प्रस्ताव रखडला आहे.
उन्हाळ्याचे दिवस असतानाही प्रवाशी वातानुकूलित बससेवेकडे पाठ फिरवत असल्याची नाराजी रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेची महासभा २७ मे रोजी होत असून महासभेत मंजुरी मिळाल्यावर वातानुकूलित बसचे किमान तिकिट दर ३० रूपायांवरून १५ रूपये होईल, २० रूपयामध्ये प्रवाशी ४ किलोमीटरपर्यत प्रवास करतील. नवीन तिकिट दर लागू झाल्यावर अवघ्या ९० रूपयांमध्ये ६० किमीचा आल्हाददायक प्रवास करू शकतील. लहान मुलांनाही तिकिट दरामध्येही सवलत मिळणार आहे.