शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे विधानपरीषद निवडणुकीसाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी रविंद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.१९९२ पासून चारवेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न करत होते. यापूर्वीही ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून जाताना डावखरेंना शिवसेनेबरोबर असलेल्या जवळीकीचा फायदा झाला होता.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या काळापासून डावखरे यांचे शिवसेनेशी संबंध सलोख्याचे राहिले आहेत.
त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीसोबत अपक्ष, इतर छोटे पक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किंगमेकर असलेले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यावर डावखरे यांची भिस्त आहे.
मात्र सत्ताधारी पक्षांना न दुखावण्याची ठाकूर यांची राजकीय परंपरा पाहता त्यांच्या पाठिंब्याविषयी डावखरे साशंक असल्याचे मानले जाते. त्यामुळेच शिवसेनेने उमेदवार उभा न करता आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी डावखरे यांचे प्रयत्न सुरू होते.
दुस-या बाजूला रविंद्र फाटक हे काहीवर्षांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. २०१४ मध्ये त्यांनी राणेंची साथ सोडून ते शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये भाजपच्या प्रमोद जठार यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवताना त्यांना भाजपच्या संजय केळकर यांनी पराभूत केले होते.