मुंबई : महसूल आणि कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाने छापलं आहे. विरोधी पक्षनेते असताना विरोधकाना सळो की पळो करून सोडणारे खडसे आता अडचणीत आले असल्याचंही सामनाने म्हटलं आहे.
*** खडसेंवरील दबाव वाढला
खडसेंचे निकटवर्तीय मानले जाणारे गजानन पाटील, यांना एसीबीने 30 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर विरोधकांचाही दबाव वाढला आहे. मात्र सत्ताधार्यांचा अजून कोणताही दबाव नसल्याचं तरी स्पष्ट आहे.
*** पंकजा, तावडेंसाठी नेते धावून आले…पण…
यापूर्वी भाजपमध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे हे अडचणीत आले होते, तेव्हा पक्षातील काही नेते मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली होती, पण आता एकनाथ खडसे यांच्यासाठी कुणीही धावून येताना दिसत नाहीय.
*** 30 कोटीचं लाच प्रकरण भोवणार?
कल्याणमधील एक शासकीय भूखंड मंजुरी प्रकरणी 30 कोटी लाच मागितली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील गजानन पाटील याला अटक केली आहे. गजानन पाटीलला आपण ओळखत असलो तरी तो आपला स्वीय सहाय्यक नसल्याचं खडसेंनी म्हटलं आहे.
*** एसीबीवर दबाव नाही-मुख्यमंत्री
खडसे प्रकरणात एसीबीवर कोणताही दबाव नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, एसीबीकडे तीन महिन्यांपासून तक्रार होती, एसीबी कायद्याप्रमाणे काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.