मुंबईत आता ऑनलाइन पार्किग
महापालिकेत बनणार नवीन विभाग
नवीन विकासआराखडा शासनाला सादर
मुंबई : वाहतुक कोंडीच्या व वाहन पार्किंगच्या समस्येने त्रस्त झालेल्या मुंबईकरांकरता आता खऱ्या अर्थांने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. मुंबई मनपा प्रशासनाने बनविलेल्या विकास आराखड्यामध्ये पार्किंगकरता नवीन विभाग बनविण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यामध्ये मुंबईकरांना आपल्या वाहनाकरता ऑललाइन पार्किंग करणे शक्य होणार आहे. मुंबईकरांना आता आपल्या वाहनाकरता मोबाईलवरूनही कोठे कोठे पार्किंगकरता जागा उपलब्ध आहे, याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. मुंबईत २७ लाख ५० हजार वाहनांची नोंदणी आहे. त्याशिवाय दररोज सरासरी ८२५ वाहनांची नव्याने नोंदणी होत आहे. याशिवाय विविध कारणास्तव दररोज हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने मुंबईत बाहेरील वाहनांचेही आगमन होत असते.
मुंबईत ज्या गतीने वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे, त्या तुलनेत वाहने उभी करण्याकरता शहरामध्ये वाहनांच्या पार्किंगकरता जागा शिल्लक राहीलेली नाही. त्यामुळे अनेकदा मिळेल त्या जागेवर मुंबईकरांना आपली वाहने उभी करावी लागतात व त्यातूनच वाहतुक कोंडींची समस्या निर्माण होते. लोक नव्याने सदनिका विकत घेताना इमारतींमध्ये वाहनांकरता पार्किंगही खरेदी करत आहेत. परंतु जुन्या इमारतींमध्ये तळाशी असलेल्या मोकळ्या जागेशिवाय पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. यामुळे आजही जुन्या इमारतींमध्ये वाहनांकरता जागाच नसल्याने इमारतीलगतच्या रस्त्यावर वाहने पार्किंग करावी लागतात. ही वाहनेच अनेकदा वाहतुक कोंडीला निमत्रंण देत आहेत.
पार्किंग समस्येवरून दक्षिण मुंबईतील परिस्थिती गंभीर रूप धारण करत चालली आहे. मागील राज्य सरकारने पार्किंगच्या नावाखाली मोफत एफएसआय देवून या जुन्या इमारतींना बहूमजली इमारतीमध्ये रूपांतरीत होण्यास परवानगी दिलेली होती. आजच्या युगात राहणीमाचा दर्जा उंचावल्याने सर्रासपणे चार-चार वाहने एका एका कुटूंबामध्ये पहावयास मिळतात. यामुळे इमारतींमध्ये सर्वच वाहनांना पार्किंगकरता जागा नसल्याने रस्त्यावर उर्वरित वाहनांना अनधिकृतरित्या पार्क करावे लागत आहे.
दक्षिण मुंबईतील मुंबादेवी, भेंडीबाजार, भायखळा आदी परिसरात अरूंद गल्लीबोळात, छोटेखानी रस्त्यावर स्थानिक रहीवाशी दुचाकी व चारचाकी वाहने मिळेल त्या ठिकाणी पार्क करत असतात. यामुळे येथून वाहने चालविताना तर सोडाच, पण लोकांना पायी चालतानाही अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. मुंबईच्या शहरात व उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध वाहन पार्किंग वाहतुक कोंडीला पोषक वातावरण तयार करत आहे.मनपाकडून काही ठिकाणी पार्किंगकरता वाहनतळ निर्माण करण्यात आलेले आहेत. परंतु त्या वाहनतळामध्ये निविदेच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि ठेकेदारांकडून वाहन पार्किंग शुल्काच्या नावाखाली मनमानी पैशाची लुटमार केली जात आहे. याप्रकरणी मनपामध्ये वरपर्यत तक्रार केली तरी अधिकारी,राजकारणी व ठेकेदार यांची वेगळी मैत्री असल्याने या तक्रारीची दखल घेतली जात नाही व कारवाईदेखील केली जात नाही. हे सर्व लक्षात घेवून प्रशासनाने मनपाच्या नवीन विकास आराखड्यामध्ये ऑनलाइन पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरता नवीन विभाग बनविण्यात येणार आहे. हा विभाग या ऑनलाइन पार्किगचे संचलन सांभाळणार आहे. आपण घरबसल्याच पार्किंगबाबत माहिती घेवून पार्किगमध्ये आपली वाहन नोंदणी करू शकणार असल्याचे या विकास आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. वाहतुक विभागाच्या मते ऑनलाइन पार्किंग योजनेची अंमलबजावणी अवघड आहे. परंतु सरकारने खरोखरीच याची अंमलबजावणी केल्यास मुंबईतील वाहतुक कोंडीच्या समस्येचे निवारण होईल आणि मुंबईकरांनाही वाहन पार्किंगची समस्या जाणवणार नाही.