नवी मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविणार्या वाहन चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची जोरदार मोहिम उघडली आहे. 1 जानेवारी 2016 पासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान वाहतूक विभागाने आतापर्यंत एकूण 972 तळीरामांविरुद्ध कारवाई केली आहे. वाढत्या वाहन अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागातर्फे ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहिम राबविण्यात येत असून यापुढे देखील सदर माहिम सुरुच राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली.
दारुची नशा करुन बेदरकापणे वाहन चालविण्यार्यांमुळे रस्त्यावरील अपघातात वाढ होत असल्याचे तसेच या अपघातांमध्ये विनाकारण नागरिकांचे बळी जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागाने मद्द पिऊन वाहन चालविणार्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईची विशेष मोहिम हाती घेतली आहे. वाहतूक विभागाच्या वाशी, एपीएमसी, रबाले, कोपरखैरणे, महापे, तुर्भे, सीवुडस्, सीबीडी, खारघर, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, तळोजा, उरण आणि शेवा आदि युनिटच्या माध्यामातुन सदर विशेष मोहिम राबविण्यात आली.
1 जानेवरी ते 30 एप्रिल 2016 या कालावधीत राबविलेल्या सदर मोहिमेदरम्यान एकूण 718 वाहन चालकांना पकडण्यात आले. तर नुकतेच 1 ते 15 मे 2016 या पंधरा दिवसामध्ये आणखी 254 तळीरामांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे वाहतूक विभागाने आतापर्यंत एकूण 972 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पकडलेल्या सर्व वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी वाहतूक विभागाने जानेवारी ते एप्रिल 2015 या चार महिन्यामध्ये 584 वाहन चालकांना पकडले होते. मात्र, यावर्षी त्यात 134 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.