ग्रामस्थांसह सर्वपक्षीय रस्त्यावर उतरले
महिलांना व्याधीचा त्रास तर मुलांना अपंगत्व
नवी मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीवरून वाद अजून शमलेला नसून मुंबईतील कचरा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तळोजा येथे टाकण्याच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत. परंतु तळोजा डम्पिंग ग्राऊंडचा स्थानिक भागातील वाद आता मोठ्या प्रमाणावर चिघळला असून तेथील ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळीची साथ लाभल्याने या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आता ‘धार’ प्राप्त झाली आहे. आधीच या‘डम्पिंग’मुळे अलिकडच्या काळात स्थानिक महिलांना अपत्य प्राप्ती होत नाही, मुलांना अपंगत्व येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात असल्याने मुंबईचा कचरा येथे आणून मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मदतीने आमचे जिवित संपविण्याच्या निर्णय घेतला आहे काय, असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून विचारला जात आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये ग्लॅक्सी इंडस्ट्रीजच्या मागील बाजूस काही वर्षापूर्वी डम्पिंग ग्राऊंड निर्माण करण्यात आले आहे. स्थानिक रहीवाशांकडून, ग्रामस्थांकडून या डम्पिंग ग्राऊंडला गेल्या पाच वर्षापासून विरोध केला जात आहे. तथापि या ठिकाणी ग्लॅक्सी इंडस्ट्रीजमधील एका कंपनीचे व्यवस्थापन स्थानिक पोलिसांना हाताशी धरून रहीवाशांचा व ग्रामस्थांचा विरोध मोडीत काढत असल्याचा आरोप ग्रामस्थ व रहीवाशांकडून करण्यात येत आहे. या विरोधानंतर मनमानी तसेच दमदाटी करत ग्लॅक्सी इंडस्ट्रीजमधील कंपन्यांचे व्यवस्थापण या ठिकाणी इंडस्ट्रीजचा कचरा दररोज मोठ्या प्रमाणावर टाकत आहे. ग्रामस्थांच्या तसेच स्थानिक रहीवाशांच्या आंदोलानाची दखल सर्वपक्षीयांनी घेत या आंदोलनाला पाठिंबाही त्यांनी कृतीतून दिला.
नुकताच सर्वपक्षीयांकडून या डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी आंदोलन व निदर्शने करण्यात आली. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुकाप्रमुख वासुदेव घरत, शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील, शिवसेनेचे ग्रामीण तालुकाप्रमुख रामदास पाटील, शहरप्रमुख लिलाधर भोईर, शेकापचे नेते बाळाराम पाटील, मनसेचे शहरप्रमुख केसरीनाथ पाटील, शिवसेनेचे खारघर शहरप्रमुख गुरूनाथ पाटील, खांदा कॉलनी विभागप्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरले होते. या आंदोलनात स्थानिक भागातील महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याच्या दुर्गधीने स्थानिक रहीवाशांना झोपही येत नाही. मुलांना व महिलांनाही अपंगत्व आले आहे. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी स्थानिकांना दमदाटी करणाऱ्या ग्लॅक्सी इंडस्ट्रीजमधील कंपनीच्या व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी तेथून पळ काढला. या ठिकाणी पुन्हा ग्लॅक्सी इंडस्ट्रीजने कचरा टाकून स्थानिकांच्या जिविताशी खेळ खेळण्याचा प्रकार केल्यास शिवसेना ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही शिवसेनेकडून यावेळी देण्यात आला आहे. आजवर स्थानिक विरूध्द ग्लॅक्सी इंडस्ट्रीजमधील कंपनी व्यवस्थापन असा डम्पिंग ग्राऊंडप्रकरणी संघर्ष होत होता, पण आता सर्वपक्षीय राजकीय घटक स्थानिकांसमवेत रस्त्यावर उतरल्याने आता डम्पिंगविरोधातील आंदोलनाला धार येण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.