रस्त्यावर होते लघुशंका व शौच
रवींद्र सावंत यांचा पाठपुरावा
नवी मुंबई : देशामध्ये स्वच्छ भारत अभियानअंतर्गत जोरदार स्वच्छता अभियान राबविले जात असून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही या मोहीमेची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईतील जुईनगर परिसर येत नाही का, असा प्रश्न करून सर्वप्रथम नवी मुंबईतील जुईनगर परिसर हगणदारीमुक्त करण्याची मागणी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष व स्वंयरोजगार विभाग, काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे.
पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या गांवदेवी चौकामध्ये सांयकाळच्या वेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिलाही बसलेल्या असतात. लघुशंकेची सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. या ठिकाणी छोटेखानी मुतारी अथवा ई-टॉयलेटची व्यवस्था करण्याची मागणीही सावंत यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.
जुईनगर सेक्टर 24 परिसरामध्ये पेट्रोलपंपाच्या मागील बाजूस खासगी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. रेल्वे रूळालगत असणार्या संरक्षक भिंतीलगतचा रस्ता व तेथील अंतर्गत रस्त्यावरून जाताना नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना दुर्गंधीचा वास सहन करत तोंडावर रूमाल ठेवून ये-जा करावी लागते. या ठिकाणी सांयकाळपासून पहाटेपर्यत रस्त्यावर आणि परिसरातील उघड्यावर लोक शौचासाठी बसलेले पहावयास मिळतात. या ठिकाणी मनपा प्रशासनाने सार्वजनिक शौचालय बांधावे याकरता रविंद्र सावंत गेल्या काही महिन्यापासून पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत आहे. गेल्याच आठवड्यात महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभाग अधिकारी आदी सर्वांना पुन्हा लेखी निवेदनातून जुईनगर परिसर हागणदारीमुक्त करण्याची मागणी केली आहे.
जुईनगर सेक्टर 24 येथे पेट्रोलपंपापासून पुढे आल्यावर तलावाच्या बाजूला बाराही महिने मुले, रहीवाशी उघड्यावर लघुशंका करताना पहावयास मिळतात. त्यामुळे त्यामुळे स्मशानभूमीच्या कोपर्यावर लघुशंकेकरता छोटेखानी मुतारीची व्यवस्था या ठिकाणी मनपा प्रशासनाने करावी याकरताही रविंद्र सावंत लेखी पाठपुरावा करत आहे.
स्वच्छ भारत अभियान नवी मुंबईत राबविले जात असून जुईनगरमधील दुर्गंधी, उघड्यावरील शौच, लघुशंका याचा या अभियानामध्ये समावेश होत नाही काय, जुईनगरच्या स्वच्छतेला या अभियानातून वगळले आहे का, असा प्रश्न रवींद्र सावंत यांनी केला आहे.
नेरूळ सेक्टर 2 व 4 परिसरातील स्मशानभूमी रस्ता ते वाधवा टॉवरपर्यतच्या रस्त्यावर तसेच सेक्टर 4च्या उद्यानामध्ये मोठ्या संख्येने सकाळ व संध्याकाळी रहीवाशी चालण्यासाठी येत असतात. या ठिकाणीदेखील कोठेही लघुशंकेची व्यवस्था नसल्याने या परिसरात रस्त्याच्या कोपर्यावर छोटेखानी मुतारी अथवा ई-टॉयलेट बसविण्याची मनपा प्रशासनाकडे सावंत यांच्याकडून मागणी केली जात आहे.
जुईनगर हगणदारी मुक्त करण्यासाठी खुले शौच व लघुशंका या समस्येतून निर्माण झालेला बकालपणा संपुष्ठात आणण्यासाठी आपण करत असलेल्या पाठपुराव्याला मनपा प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासन जाणिवपूर्वक जुईनगरवासियांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप रवींद्र सावंत यांनी केला आहे.