अहमदाबाद : गुजरातमधल्या गोधरा जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी फारुक मोहम्मद बना याला आज गुजरात एटीएसने अटक केली आहे. मागील्या 14 वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरत होता. 2002 साली गोधरामध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या S6 या डब्याला आग लावण्यात त्याचा प्रमुख हात होता. त्यानेच हा सर्व कट रचल्याचं सांगितलं जातं.गेल्याच वर्षी गुजरात पोलिसांनी गोधरा जळीतकांडाचा आरोपी हुसेन सलमान मोहम्मद याला मध्यप्रदेशातील झाबुआमधून अटक केली होती. त्यावेळीही हुसेन सलमान मोहम्मद हा गोधरा जळीतकांडाचा मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात आलं होतं. तो जवळपास 13 वर्षांपासून फरार होता.
27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधल्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्स्प्रेसचा S6 डबा पेटवल्यानंतर तब्बल 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या जळीतकांडानंतर गुजरातमध्ये भीषण धार्मिक दंगली उसळली होती.
गोधरा जळीतकांडाच्या वेळी फारुक मोहम्मद बना तेव्हा गोधरा नगरपालिकेचा नगरसेवक होता. गोधरा जळीतकांडाचा तपास वेगाने सुरु झाल्यावर अटक टाळण्यासाठी त्याने गुजरात सोडून थेट मुंबईत बस्तान बसवलं. मुंबईत तो रियल इस्टेट ब्रोकरचं काम करायचा.
गोधरा जळीतकांडाला आता 14 वर्षे झाली आहेत. त्यामुळे सर्वजण विसरलेही असतील, असा विचार करुन तो गोधराला परत जात असतानाच त्याला पंचमहाल जिल्ह्यातील कालोल गावाजवळच्या टोलनाक्यावर त्याला अटक करण्यात आली