नवी मुंबईः नवी मुंबईतील वाढत्या चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांबरोबरच उकल न झालेल्या जुन्या गुन्ह्यांची उकल करण्यावर अधिक
भर देण्यात येणार असून त्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद वाढविणार असल्याचे नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
13 मे रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच हेमंत नगराळे यांनी 18 मे रोजी पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या 28 वर्षाच्या पोलीस सेवेतील कामगिरीची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. सन 1989 मध्ये चंद्रपूर या नक्षलवादी भागात एसआरपीच्या जवानांची गाडी भूसुरुंगाने उडविण्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या तपासाबरोबरच हेमंत पारेख आणि हर्षद मेहता यांच्या घोटाळ्याची चौकशी, तेलगी प्रकरण आणि पुणे येथे एमपीएससी प्रश्नपत्रिका घोटाळ्याची चौकशी देखील आपण केली असल्याचे हेमंत नगराळे यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई शहर मुंबई आणि पुण्याच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे येथील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली असली तरी गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत नाही. अलिकडे गुन्हेगारीत
जी वाढ झाली आहे ती जास्त नाही. तसेच गुन्हे उघडकीचे प्रमाण 60 टक्क्याहून अधिक असून इतर शहरांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नवी मुंबईचे
पोलीस कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचार्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे
ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकारणी यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाची पाहणी करुन त्याचा फेरविचार करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ई-गव्हनर्स आणि पारदर्शकतेवर आपला अधिक भर राहणार असल्याचे सांगत नागरिकांनी आपली तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ई-मेल द्वारे आपली तक्रार पाठविल्यास त्याची चौकशी करुन त्यात तथ्य आढळल्यास त्या तक्रारीचा एफआयआर दाखल
करण्यात येईल. त्यासाठी मात्र तक्रारदाराला पोलीस ठाण्यात येणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर दारु, गुटखा, बिडी, सिगारेट यांच्यावर कायदेशीर बंदी असली तरी अशा वस्तुंचे ग्राहक आहेत तोपर्यंत सेवनाचे सदर पदार्थ पूर्णतः बंद होणे शक्य नाही. परंतु, त्यावर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस करणार आहेत. तर नागरिकांनी देखील अशा अंमली पदार्थाचे सेवन टाळावे असे सांगत सायबर गुन्ह्यांची संख्या पाहता सायबर सेल अधिक सक्षम करण्यासाठी चांगल्या आणि प्रशिक्षित अधिकार्यांचा आपण शोध घेऊन त्यांची नियुक्ती करु, असेही आयुक्त हेमंत नगराळे यावेळी म्हणाले.