नवी मुंबईः नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताच हेमंत नगराळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील अनैतिक धंदे, कायद्याचे उल्लंघन करणार्या बारवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेतील अधिकार्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादामुळे शहरातील बारमध्ये परवानगी, महिला वेटर्सकडून होणारे अश्लिल हावभाव आदिंबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेळ्या पथकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध बारवर 16 मे रोजी धाडसत्र अवलंबिले.
या कारवाई वेळी कोपरखैरणे, वाशी, सीबीडी आणि पनवेल तालुका या पोलीस ठाणे हद्दीत नटराज, संडे, मधुबन, नाईट रायडर्स, व्रेझी बॉईज, माया, स्टार नाईट, गबाना आदि बार तपासण्यात आले. तपासणी करण्यात आलेल्या बारपैकी काही बारमध्ये बेकायदेशीर कृत्य आढळून आले. त्यामुळे सदर बारवर आणि तेथील कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या संडे आणि मधुबन बारमध्ये महिला वेटर, पुरुष वेटर, मॅनेजर आणि इतर ग्राहक बेकायदेशीर वर्तन करताना आढळून आले. त्यामुळे सदर बारमधील एकूण 24 जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माया बारमध्ये महिला वेटर बेकायदेशीर वर्तन करताना मिळून आल्याने सदर ठिकाणी एकूण 17 महिलांवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई प्रसंगी गुन्हे शाखेमधील मध्यवर्ती कक्षचे पोलीस निरीक्षक जे. जे. कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, कक्ष-2 चे पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हाटकर, मालमत्ता-मोटार वाहन चोरी प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षच्या पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे तसेच गुन्हे शाखेकडील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा सहभाग होता.