नालेसफाईला अजून मुहूर्ताची प्रतिक्षा
पावसाळा तोंडावर आलाय
मुंबई : यंदा पावसाचे लवकर आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मे महिना अर्ध्यावर आला, पण नेहमीप्रमाणे याही वर्षी मुंबईतील नालेसफाईची काम पर्ण झालेली नसल्याचं चित्र मुंबईत पहायला मिळत आहे. नालेसफाईच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी उपनगरातील बहुसंख्य नाल्याची सफाई झालीच नसल्याचे आढळून आले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई पूर्ण न झाल्याने मुंबईतील अनेक भाग जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील नाले म्हणजे अक्षरश: छोटे देवनार कचरा डेपोच झाले आहेत. धारावीतल्या ६० फूट रोडवर असेलल्या नाल्यात गेल्या वर्षीही कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला होता. यावेळी मात्र कहर झालाय, कारण या नाल्याचं नालेसफाईचे शून्य टक्के काम झाल्याचे दिसून येत आहे. तर मानखुर्द-गोवंडीचा भाग तसा प्रशासनाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित राहिला आहे. गोवंडीतल्या नाल्यांची तर वर्षानुवर्ष सफाई होत नाही. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साठला आहे. शिवाय नाल्याच्या आसपास झोपडपट्ट्याही आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. भाजप आणि शिवसेनेच्या चढाओढीच्या राजकारणात या नाल्याची सफाई झालेली नाही. याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.
पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्याच्या मुद्यावरून महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असताना, पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची एकमेकांविरुद्ध गाळफेक सुरू झाली आहे.
नालेसफाईची जबाबदारी प्रशासनाची, शिवसेनेचे स्पष्टीकरण
यंदा पावसाळा जवळ आला तरी नाले सफाई झालेली नाही. पण याकडे लक्ष्य देण्याऐवजी सत्ताधारी एकमेकांवर आरोप करण्यात मग्न आहेत. आधी नाले सफाई झाली नाही म्हणून भाजपने सेनेवर आरोप केले. आता सेना आमचा यात काही हस्तक्षेप नाही, ही जबाबदारी प्रशासनाची आहे, हे सांगून हातवर केले आहेत.
नाल्यातील काढले गाळ ठेकेदार टाकणार कुठे याच प्रशासनाकडे काहीच उत्तर नसल्याने हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला होता, अखेर सोमवारी याला मंजुरी देण्यात आली. नाल्यातील गाळ काढण्याचे प्रस्ताव शिवसेनेने कधीच थांबवले नाहीत. प्रशासनाने प्रस्ताव उशीर आणले. नालेसफाई भ्रष्ट्राचार झाला असतानाही यावेळी गाळ कुठे टाकले जाणार हे प्रशासन यावेळीही सांगत नाही. शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. असा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला.