आठवडाभरात नवी मुंबईतील 863 अनधिकृत नळजोडण्या खंडीत
नवी मुंबई :
महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यास सुरुवात केली असून जलबचतीच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत नळजोडण्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आठही विभाग क्षेत्रात अनधिकृत नळजोडण्यांवर धडक कारवाई करण्यात येत असून आठवडाभरात तब्बल 863 अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत.
बेलापूर विभागात 58, नेरुळ विभागात 81, वाशी विभागात 86, तुर्भे / सानपाडा विभागात 141, कोपरखैरणे विभागात 57, घणसोली विभागात 37, ऐरोली विभागात 180 तसेच दिघा विभागात 223 अशा एकुण 863 नळ जोडण्यांवर 9 ते 13 मे 2016 या कालावधीत धडक कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून कधी नव्हे तो महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी कामाला लागल्याचे पहावयास मिळत आहे. अनधिकृत नळ जोडण्या व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पण कारवाई केवळ पालिका आयुक्त मुंढे यांना दाखविण्यापुरतीच केली असून कारवाईचा कोठेही प्रभाव पहावयास मिळत आहे. अनधिकृत नळजोडण्या तोडताना चांगल्या रस्त्यांवर खोदकाम करून रस्ते खराब करण्यात आले. नळजोडण्यात तोडल्या असल्या तरी प्रत्यक्षात पाणीचोरांनी अवघ्या काही सेंकदामध्ये प्लंबरला बोलावून तोडलेल्या नळजोडण्या पुन्हा जोडण्यात आल्या. पाणीचोरांवर या कारवाईचा काडीमात्र परिणाम झाला नसून सर्वसामान्यांमध्ये मात्र पालिका कारवाईचे हसे झाले आहे.
अतिक्रमण कारवाई करताना नेरूळ सेक्टर 8 मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीजवर केलेल्या अतिक्रमणाची पालिका आयुक्तांनी माहिती मागवून घेतल्यास व प्रत्यक्षात सांयकाळनंतर पालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी भेट दिल्यास नेरूळ पालिका विभाग अधिकारी कार्यालय आयुक्तांच्या डोळ्यात कशाप्रकारे धुळफेक करत आहे, याचे आयुक्त मुंढे यांना घटनास्थळी गेल्यावरच उत्तर पहावयास मिळेल. अतिक्रमणाबाबत नौटंकी केल्यावर पालिका विभाग अधिकारी कार्यालयास कोणी विचारणा केल्यास संबंधित अधिकारी उर्मटपणे लेखी तक्रार करा, असे बिनधास्तपणे उत्तर देत आहे. करदात्या नागरिकांच्या करावर वेतन घेणार्या पालिका अधिकार्यांन आजवर कोणी शिस्त न लावल्याने नवी मुंबईत बकालपणा वाढीस लागला आहे. अनधिकृत नळजोडण्या व नेरूळ सेक्टर 8 मधील चायनीजवाल्यांवर नेरूळ विभाग कार्यालयाचा लळा याबाबत पालिका आयुक्त मुंढे यांनी लेखी अहवाल मागवून घ्यावा आणि प्रत्यक्षात जावून पाहणी करावी म्हणजे पालिका आयुक्त मुंढेंना प्रत्यक्षात आपल्या डोळ्यात कशाप्रकारे धुळफेक केली जात आहे, हे पहावयास मिळेल अशी चर्चा नवी मुंबईकरांमध्ये सुरू आहे.