मुंबई- महसूलमंत्री एकनाथ खडसे कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम यांच्यात फाेनवर झालेल्या कथित संभाषणाच्या अाराेपावरुन सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले अाहे. मात्र हे अाराेप कसे चुकीचे अाहेत हे दाखवण्यासाठी खडसेंनी बुधवारी चक्क अापल्या दालनात पत्रकारांसमाेर संगणक तज्ज्ञांच्या मदतीने फाेन हॅकिंगचे प्रात्यक्षिकच करुन दाखवले.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील खडसेंच्या दालनात दोन तरूणांनी त्यांच्या लॅपटाॅवरून हे प्रात्यक्षिक दाखवल्याने उपस्थितांची मती गुंग झाली. या तरूणांनी खडसेंच्या फोनवरून एक फाेन केला. तो फोन तेथे हजर असलेल्या एका पत्रकाराच्या मोबाईलवर आला. मात्र हा फोन खडसेंच्या फोनवरून केला गेला असला तरी त्या पत्रकाराच्या फोनवर नंबर आला तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा. अशाच प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान वापरून आपला अाणि दाऊदचा संपर्क झाल्याचे भासवण्यात आल्याचा दावा खडसेंनी केला.
दाऊदने अापली पत्नी महजबीन शेख हिच्या फोनवरून खडसेंशी सातवेळा फोन केल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्या प्रिती मेनन यांनी केला आहे. यासंदर्भात हॅकर मनिष भंगाळेने गोळा केलेला डेटा मेनन यांनी मुंबई पाेलिसांकडे दिल्याने खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाची सध्या मुंबई पाेलिस एटीएसमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र गेले वर्षभर आपला सदरचा मोबाईल बंद असून त्या फाेनमधील सीमकार्डचे क्लोन करून दाऊदशी संपर्क झाल्याचे भासवण्यात आले असावे, असा दावा खडसे यांनी केला होता. आपला हा दावा कसा खरा आहे हे दाखवण्यासाठी खडसेंनी हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवले अाणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
क्रझी काॅल.नेट या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन तरूणांनी फाेन हॅकिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेबसाईटवर पत्रकाराचा अंजली दमानिया यांचा नंबर टाकल्यानंतर खडसेंच्या फोनवरून पत्रकारला फोन करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हा फोन दमािनयांच्याच नंबरवरून आल्याचे आढळून आले. पत्रकाराकडे दमानियांचा नंबर त्यांच्या नावासह सेव्ह करण्यात आला होता. तरीही खडसेंचा फोन येण्याएेवजी पत्रकाराच्या माेबाईल स्क्रिनवर दमानियांचे नाव आले अाणि सगळे अचंबित झाले.