डोंबिवली : केमिकल स्फोटाने हादरलेल्या डोंबिवलीकरांना आता चोरट्यांचा सामना करावा लागत आहे. कारण स्फोटानंतर आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या नागरिकांची घरंच लुटायला चोरट्यांनी सुरुवात केली आहे.
डोंबिवलीतल्या स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 हून अधिक घरफोड्यांची नोंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे स्फोटात घरदार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या हतबलतेचा फायदा घेणारे चोरटे पाहून असंवेदनशीलतेचं दर्शन घडत आहे.
प्रोबेस कंपनीमधील स्फोट बॉयलरमध्ये झाला नव्हता. अशी माहिती एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे. कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतं आहे. कंपनीत बॉयलरच नसल्याची कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे. या स्फोटातील मृतांची संख्या 12 वर जाऊन पोहोचली आहे.
या स्फोटातील मृतांमध्ये कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांची दोन मुलं आणि सुनेचा समावेश आहे. स्फोटात सुमित वाकटकर, नंदन वाकटकर आणि सुमितची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात कंपनीचे मालक विश्वास वाकटकर हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.