नवी मुंबई : गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धोकादायक इमारतींची घोषणा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करुनन नवी मुंबईतील हजारो कुटुंबांना दिलासा दिला आहे. यामुळे आता धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीव मुठीत धरुन राहणाऱ्या रहिवाशांवरील टांगती तलवार दूर झाली असून, लोकांनी याचे स्वागत केले आहे .
सिडकोने 1970 पासून नवी मुंबई वसविण्यास सुरवात केली. गरिब आणि मध्यमवर्गींयासाठी सिडकोने उभारलेली घरे 15 वर्षातच पडण्यालायक झाली. वाशीतील हजारो घरे धोकादायक असल्याचे राज्य सरकार, सिडको , पालिकांचे अहवाल असतानाही आजपर्यंत मनपा प्रशासनाने धोकादायक इमारती घोषीत केल्या नव्हत्या.
पालिकेच्या या बोटचेपी धोरणामुळे सध्या हजारो कुटुंब जीव मुठीत धरून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये एक एक दिवस काढत आहेत. मात्र नुकतेच पालिका आयुक्त म्हणून रूजू झालेल्या तुकाराम मुंढे यांनी आपल्या निर्णयक्षमतेची चुनुक दाखवित 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून शहरवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.
पालिकेने 187 सोसायट्या धोकादायक असल्याचे जाहिर केले आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना आपल्या घराची पुर्नबांधणी करता येणार आहे. त्याच बरोबर नवी मुंबईला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडू नये म्हणून, येत्या 2 महिन्यात शहराचा विकास आराखडाही पूर्ण करणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
वाशीतील नगरसेवक असलेले किशोर पाटकर गेल्या १५ वर्षापासून पालिका दरबारी धोकादायक इमारती घोषीत करा, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीकडून पालिका प्रशासनावर दबाव असल्यानेच धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप पाटकरांनी केला आहे. मात्र आता नवीन आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील कळीचा मुद्दा बनलेला धोकादायक इमारतींचा पश्न त्वरीत सोडवला आहे. त्याच पद्धतीने विकास आराखडाही लवकर तयार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.