: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना फोन आल्याच्या प्रकरणाला आज नवीन वळण मिळाले आहे. सायबर हॅकर मनीष भंगाले यांनी खडसे विरोद्धात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने खडसे यांना आलेल्या फोनकॉल्स डिटेल्सची सीबीआयमार्फात चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली आहे. त्यामुळे दाऊद फोन कॉलप्रकरणात खडसे यांची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.
आपच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी खडसे-दाऊद कथित संभाषणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमत्र्यांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने चौकशी करुन खडसे यांना क्लीन चीट दिली होती. चौकशीत असं कोणतंही संभाषण झाल्याचं आढळून आलेलं नाही, असे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर आपल्या म्हणण्यावर ठाम राहत हॅकर मनीष भंगाळे याने आता कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
भंगाळे याने याप्रकरणी जलदगतीने सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. खडसे यांच्या मोबाइल नंबरवर दाऊदच्या घरातून वारंवार फोन आलेत आणि त्यांच्यात संभाषण झालेले आहे, हे 101 टक्के सत्य आहे. माझ्याकडे त्या कॉललॉगचा पुरावा आहे. हे सर्व पुरावे हायकोर्टात सादर करण्यात आले आहेत, असं भंगाळे याने माध्यमांशी बोलताना सांगितलं.