: मोदी सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्याबद्दल देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. त्यावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच निशाणा साधला. देशात दुष्काळ पडला आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना सोहळे कसे साजरे केले जाऊ शकतात?, असा सवाल करत नरेंद्र मोदी हे ‘देशाचे पंतप्रधान आहेत, शहेनशहा नव्हेत’, याचे भान असू द्या, असा खोचक टोला सोनियांनी लगावला आहे.
सोनिया गांधी आज रायबरेली दौर्यावर आल्या असता पत्रकारांनी सोनियांवर मोदी सरकारच्या दोन वर्ष पूर्ण केल्याच्या सोहळ्यावर आणि वढेरा यांच्यावर झालेल्या आरोपांवरून प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रश्नांना थेट उत्तर देत त्यांनी मोदी सरकारवर पलटवार केला.
भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे कारस्थान रचले आहे. त्या माध्यमातून काँग्रेसविरोधात सूड उगवला जात आहे. त्यासाठी दररोज काही ना काही नवीन कारस्थान शोधून काढतायेत आणि आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जर खरंच असं काही असेल तर मग निष्पक्षपणे खुशाल चौकशी करा. ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असं आव्हानच सोनियांनी दिलं आहे.