कंत्राट धार्जिण्या धोरणामुळे ४६ भूमिपुत्रांवर बेकारीची कुर्हाड
नवी मुंबई ः उत्पादनाची मागणी घटल्याचे कारण पुढे करुन तुर्भे एमआयडीसी मधील स्विझेरा लॅब प्रा. लि. या कंपनीने ४६ भूमिपुत्र कायम कामगारांना कामावरुन काढले आहे. एकीकडे गेट बंद करुन कंपनी बंद असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र कंत्राटी कामगारांच्या मार्फत स्विझेरा लॅब प्रा. लि. या कंपनीमध्ये काम सुरु ठेवण्यात आले आहे. एक ठेकेदार दादागिरीच्या जोरावर कंत्राटी कामगार स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनीत घुसवत असल्याने गेल्या १५ वर्षांपासून या कंपनीत काम करणारे ४६ भूमिपुत्र कामगार मात्र देशोधडीला लागले आहेत.
उद्योजक विनय सापते यांच्या मालकीच्या स्विझेरा लॅब प्रा. लि. या कंपनीमध्ये क्षय रोगावरील उपचाराच्या गोळ्या तयार केल्या जातात. १ एप्रिल २०१६ रोजी स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनी व्यवस्थापनाने उत्पादनाला मागणी घटल्याचे कारण पुढे करुन ४६ कामगारांचे काम अचानक बंद केले. काम बंद करण्यापूर्वी कामगारांना कोणतीही नोटीस न देता थेट कंपनी गेटला टाळे ठोकण्यात आले. मात्र, स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनी बंद केली असली तरी कंपनीमध्ये उत्पादन मात्र सुरु ठेवण्यात आले आहे. या कंपनीला लागून असलेली मनिष एक्सपोर्ट कंपनी विनय सापते यांच्याच मालकीची आहे. त्या कंपनीतून कंत्राटी कामगार र्स्विंझेरा लॅब प्रा. लि. कंपनीमध्ये घुसवले जातात.
कायम कामगारांना कमी करण्यात आले असले तरी एका ठेकेदाराचे ५० कंत्राटी कामगार स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनीत काम करीत आहेत. जर कामगार कमी पडले तर गोवंडी येथील मनिष फार्मास्युटीकल या कंपनीतून कामगार आणले जातात. स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनी व्यवस्थापनाच्या या बनवाबनवीला कंपनीतील कायम कामगारांनी विरोध केला आहे. मात्र, ‘राष्ट्रवादी’च्या कंपनी धार्जिण्या आणि कामगार विरोधी धोरणामुळे तो हाणून पाडला गेला. तुर्भे पोलीस देखील कंपनीच्या पेरोलवर असल्यासारखे बोलत असल्याची खंत बेरोजगार झालेले कंपनीतील कामगार व्यक्त करीत आहेत.
स्विझेरा लॅब प्रा. लि. कंपनीत कुकशेत गावातील ६, सानपाडातील ११, कोपरखैरणेतील ८, तुर्भेतील १, शिरवणेतील ८, जुहूगावातील ३, घणसोलीतील ३, वाशीगावातील २, चिरनेर, गव्हाण आणि शिवाजीनगर येथील प्रत्येकी १ कामगार असे ४६ जण कायमस्वरुपी काम करत होते. त्या सर्वांवर आता उपासमारीची वेळ ओढावली आहे. सदर प्रकारामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.