सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कुकशेतच्या जमिनीवर वसलेल्या हर्डिलीया कंपनीमध्ये रोजगारांमध्ये कुकशेतच्या ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास कंपनीच्या गेटवरच आमरण उपोषण करण्याचा इशारा कुकशेतचे युवा ग्रामस्थ , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक सुरज पाटील यांनी हर्डिलिया कंपनीच्या एस.आय.ए ग्रुपच्या व्यवस्थापकांना एका लेखी निवेनातून दिला आहे.
हर्डिलिया कंपनी येण्यापूर्वी त्या ठिकाणी कुकशेतच्या ग्रामस्थांची शेतजमिन व निवासी घरे होती. या शेतजमिनी व घरांची जागा एमआयडीसीने प्रकल्पांकरता हस्तांतरीत केल्या. या ठिकाणी एमआयडीसीने आपल्या कंपनीस जागा दिली. आपणास कुकशेतच्या ग्रामस्थांची जागा दिल्याने कुकशेतच्या ग्रामस्थांना मुळ मालकी हक्काच्या जागेतून नेरूळ सेक्टर १४ या ठिकाणी स्थंलातरीत व्हावे लागले. तत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे काही प्रमाणात ग्रामस्थांना कंपनीने रोजगारात सामावून घेतले. त्यातील काही सेवानिवृत्त झाले तर काहीजण निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.
कंपनीच्या विकासात ग्रामस्थांचे योगदान व त्याग असल्याने नोकरभरती प्रक्रियेत कुकशेतच्या ग्रामस्थांना न्याय देणे आवश्यक आहे. आठवडाभराच्या कालावधीत कंपनी व्यवस्थापणाने कुकशेतच्या ग्रामस्थांना रोजगारात समाविष्ठ करून घ्यावे. कंपनी व्यवस्थापणाने कुकशेतच्या ग्रामस्थांना रोजगाराबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास कंपनीच्या गेटवर आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला आहे.