नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहामुळे नवी मुबंई पोलिसांवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्याबरोबरच तळोजा जेलमधील सुमारे २०० ते २५० कैद्यांना दरदिवशी विविध ठिकाणच्या न्यायालयात नेण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. या कैदी पार्टीसाठी नवी मुंबई पोलिसांना दरदिवशी सुमारे ४०० ते ४५० पोलीस बळ पुरवावे लागत असल्याने नवी मुंबई पोलिसांची कैदी पार्टीसाठी पोलीस बळ पुरवताना दमछाक होत आहे.
तळोजा जेलसाठी फक्त शंभर पदांची मंजुरी असताना, असतानाही नवी मुंबई पोलिसांना तळोजा जेलमधील कैद्यांसाठी अधिक पोलीस फौजफाटा पुरवावा लागत आहे. कैद्यांच्या वर्गवारी नुसार त्यांना पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त पुरवावा लागत असून गंभीर गुन्ह्यातील कैद्यांना किमान आठ पोलीस अधिकारी कर्मचारी तर छोट्यातल्या छोट्या कैद्यासाठी देखील किमान दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी द्यावे लागत आहेत. कैद्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमीवरुन कुठल्या कैद्याला किती पोलिसांचा फौजफाटा पुरवायचा, याचा निर्णय तुरुंग अधिक्षकाकडून घेतला जातो. त्यामुळे चारशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा नवी मुंबई पोलिसांना दरदिवशी तळोजा जेलमधील कैद्यांसाठी पुरवावा लागतो. कैदी पार्टीसाठी निवडलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सकाळी ७ वाजता तळोजा जेलमध्ये हजर रहावे लागते. त्यानंतर सकाळी ९-१० नंतर कैदी जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना विविध ठिकाणच्या न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांना न्यावे लागते. या कैद्यांना न्यायालयात हजर करेपर्यंत पोलिसांना ताटकळत उभे रहावे लागते. त्यानंतर पुन्हा कैद्यांना सुरक्षितपणे बंदोबस्तात जेलमध्ये आणून सोडावे लागते. न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीची न्यायाधिशांकडून फक्त खात्री करुन घेऊन त्याची पुन्हा जेलमध्ये रवानगी करण्यात येते. या कामासाठी पोलिसांचा मात्र संपुर्ण दिवस वाया जातो. जेलमधील कैद्यांची दरदिवशी ने-आण करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना पोलीस स्टेशन आणि इतरत्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना कैदी पार्टीसाठी पाठवावे लागते. तळोजा जेलमधील कैद्यांसाठी दररोज जवळपास ४०० ते ४५० पोलीस अधिकरी-कर्मचारी तैनात करावे लागत असल्याने दरदिवशी कैद्यांसाठी लागणारा इतका मोठा पोलीस फौजफाटा पुरवायचा कसा?, असा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पडला आहे.
तळोजा जेलमधील कैद्यांच्या बंदोबस्तासाठी दररोज ४०० ते ४५० पोलीस अधिकारी-कर्मचारी लागत असल्याने नवी मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात तसेच दैनंदिन घडणारे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना उपलब्ध पोलीस बळावर समाधान मानावे लागत आहे. तळोजा जेलसाठी दरदिवशी अतिरिक्त पोलीस बळ पुरवावे लागत असल्याचा परिणाम नवी मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच बंदोबस्तावर होत आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले.
काही पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना गुन्ह्यांच्या तपासाचे काम सोडून कैदी पार्टीसाठी जावे लागत असल्याने गुन्ह्यांच्या तपासावर देखील त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे तळोजा जेलसाठी दरदिवशी इतके मोठे पोलीस बळ पुरविणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याने पोलीस दलातुनच याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तळोजा जेलमध्ये असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उभे केल्यास पोलीस मनुष्यबळाची जबाबदारी, गाडीच्या इंधनाचा खर्च तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ने-आण करण्याचा धोका टळू शकणार आहे. तळोजा जेलमध्ये व्हीडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करुन दिल्यास पोलिसांना आणि जेल प्रशासनाला देखील दिलासा मिळू शकणार आहे, अशी चर्चा पोलीस दलात होत आहे.