नवी मुंबई ः दिघा मधील अनधिकृत इमारत बांधकामामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेले ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’चे नगरसेवक नवीन मोरेश्वर गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा नवीन गवते आणि दीपा राजेश गवते यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार कायम राहिली आहे. या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत अंतिम सुनावणी आता १० जून २०१६ रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढे होणार आहे. त्यामुळे नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, नगरसेविका दीपा गवते यांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला आहे.
आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेत हस्तक्षेप अर्ज करणारे ब्रिजेश मिश्रा यांनीही दिघा मध्ये अनधिकृत इमारत उभारुन गोरगरीबांची फसवणूक केल्याबद्दल नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांचे पद रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या तीन नगरसवेकांना एमआरटीपी आणि महाराष्ट्र महापालिका कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याबद्दल ‘आपणास नगरसेवक- नगरसेविका पदापासून अपात्र का ठरवू नये,?’ अशी कारणे दाखवा नोटीस २१ एप्रिल २०१६ रोजी बजावली होती. कारणे दाखवा नोटीशीनंतर महापालिका आयुक्तांना अपात्रतेची कार्यवाही करण्याचा अधिकारच नाही, असा दावा करत नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांनी अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० मे रोजी न्या. अजय गडकरी आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी न्या. अजय गडकरी आणि न्या. एम. एस. कर्णिक यांनी याचिकादारांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. याविषयी महापालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देऊन न्या. अजय गडकरी आणि न्या. एम. एस. कर्णिक यांनी या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ जून २०१६ रोजी ठेवली आहे. बेकायदा बांधकाम प्रकरणी नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांना अपात्र ठरविण्याबाबत २४ मे २०१६ रोजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापुढे सुनावणी झाली. सुनावणीवेळी महापालिका आयुक्तांना नगरसेवकांवर अपात्रतेची कार्यवाही करण्याचा अधिकारच नाही, असा आक्षेप नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांनी घेतला. मात्र, तीन नगरसेवकांचा कारवाई बाबतचा आक्षेप महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळून लावला. त्यांनतर अनधिकृत बांधकाम प्रकरणी आपला बचाव करण्यासाठी काही कागदपत्रे सादर करण्याकरिता थोडे दिवस वेळ देण्यात यावा, अशी विनंती नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ४ जून २०१६ रोजी ठेवली होती. या सुनावणीकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले होते. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची सुनावणी आता १० जून २०१६ रोजी ठेवली आहे.
नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड.अपर्णा गवते, दीपा गवते अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी आढळून त्यांना नगरसेवक पद सोडावे लागले तर बेकायदा बांधकामामुळे नगरसेवक पद गमवावे लागल्याची नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना घडणार आहे. तुर्तास नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांना आणखी काही दिवस दिलासा मिळाला असला तरी नगरसेविका ऍड. अपर्णा गवते यांनी यापूर्वीच महापालिका स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हाती नगरसेवक नवीन गवते, नगरसेविका ऍड. अपर्णा गवते, दीपा गवते यांचे भवितव्य आहे.