राज्य मंडळाच्या पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाने निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केली असून, विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर व मोबाईलद्वारे निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना 15 जून रोजी गुणपत्रिकेबरोबर कलचाचणीचा कल अहवालाचेही वाटप केले जाणार आहे.
यंदा दहावीला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले असून, निकालाची तारीख जाहीर झाल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यमंडळ कार्यालयातील ‘शारदा’ सभागृहात दहावीच्या निकालासंदर्भात उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदही आयोजित केली आहे. पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाकडून राज्यातील टक्केवारीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
दहावीचा निकाल एसएमएसद्वारे मोबाईलवरही समजणार आहे. निकाल जाणून घेण्यासाठी बीएसएनएल धारकांनी mhssc<space><seatno> असा मॅसेज 57766 या नंबरवर करायचा आहे. तर एअरटेल धारकांनी MAH10<space><roll number>सह 5207011 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो, टेलिनॉर कंपनीच्या धारकांनी MAH10<space> <roll number> असा मॅसेज टाईप करून 58888111 या नंबरवर पाठवल्यास तात्काळ निकाल समजणार आहे.