नवी मुंबई : नवी मुंबई शहरात झालेली विकास कामे व अत्याधुनिक नागरी सुविधा यांचा विचार करता नवी मुंबईकरांसाठी अच्छे दिन नक्कीच आले आहेत, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री गणेश नाईक यांनी येथे केले.
नेरूळ सेक्टर १८ येथील पामबीच रोड लगतच्या सागर दर्शन सोसायटीत महानगर गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
नवी मुंबई शहरातील नागरिकांवर मालमत्ताकर किंवा पाणीपट्टी कराचे ओझे न वाढवता शहरात पाणी, रस्ते, उद्याने, मलनि:स्सारण प्रकल्प आदी सारख्या अत्याधुनिक नागरी सुविधा महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच नागरिकांना देण्यावर भर दिला आहे. शहरात पालिकेच्या माध्यमातून राबविलेल्या आधुनिक विकास प्रकल्पांचा नावलौकिक जगभर आहे, असे सांगून श्री. नाईक म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या स्मार्ट सिटी संकल्पनेचा जन्म होण्याआधीच नवी मुंबई शहर स्मार्ट पेक्षाही पुढे गेले आहे. या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका रुपाली भगत, राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य विकास पालकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश भगत आदी नागरिक तसेच पामबीचरोड वरील सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.