नवी मुंबईः प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कोकण विभागीय महसुल आयुक्त तानाजी सत्रे 36 वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.
तानाजी सत्रे यांनी ऑनलाईन नागरी सुविधा देण्याचे सुरु केलेले काम अविस्मरणीय राहणार आहे. कोल्हापूर येथे पदवी पर्यंतचे शिक्षणपूर्व केल्यानंतर सन 1978 मध्ये बीएसस्सी अॅग्री पदवी घेतल्यानंतर तानाजी सत्रे यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून एमएसस्सी अॅग्री पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. दरम्यान, प्रशासकीय सेवेत कार्यकरण्याची जिद्द मनासी बाळगत एमपीएससी परीक्षा देण्याचे तानाजी सत्रे यांनी ठरविले. पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा
उत्तीर्ण झाल्यानंतर तानाजी सत्रे यांच्या प्रशासकीय सेवेतील कारकिर्दीला सुरुवात झाली. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर तानाजी सत्रे यांची सन 1987 मध्ये प्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून
रत्नागिरी येथे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग, उल्हासनगर, ठाणे, मुंबई, अहमदनगर, नांदेड या ठिकाणी विविध महत्त्वाची पदे भूषविली. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून 2001 मध्ये रूजू झाल्यानंतर तानाजी सत्रे यांनी ई- गव्हर्नन्ससारख्या सुविधा
राज्यात प्रथमच राबविली. एमआयडीसी कार्यकारी अधिकारी पदी असताना उद्योजक आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तानाजी सत्रे यांनी अनेक योजना राबविल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक असताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच मेट्रो प्रकल्पाचे नियोजन देखील तानाजी सत्रे यांनी केले. सन 2015 मध्ये तानाजी सत्रे यांची कोकण विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अवघ्या 9 महिन्यांच्या आपल्या आयुक्त पदाच्या कार्यकाळात तानाजी सत्रे यांनी महत्त्वपुर्ण निर्णय घेतले. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेत अनेकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना वठणीवर आणले. प्रशासकीय सेवेच्या 36 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर 31 मे 2016 रोजी तानाजी सत्रे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.