नवी मुंबई : वाशी येथे मार्जिनल स्पेसच्या नावाखाली नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विरोधी विभागाद्वारे सुरू असलेल्या कारवाईमध्ये भेदभाव केला जात असल्याने व्यवसायिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदपथ आणि मार्जिनल स्पेस नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. पदपथ आणि मार्जिनल स्पेस जागेतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई नवी मुंबई शहरात सगळीकडे समानतेने होणे आवश्यक असताना महापालिका अतिक्रमण विरोधी विभागाद्वारे वाशी विभागात मार्जिनल स्पेस जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या करण्यात आलेल्या कारवाईत भेदभाव करण्यात आल्याचे दिसून येत आहे. वाशी सेक्टर- 17,9,10,15,16 या परिसरातील, अरेंजा कॉर्नर इमारतीतील, वाशी-तुर्भे लिंक रोड समोरील काही दुकानदारांनी मार्जिनल स्पेस इमानेइतबारे मोकळी सोडली आहे. तर काहींनी दुचाकी पार्किंग करणे, टायर विक्री करणार्यांनी दुकानासमोरील मोकळ्या जागेत टायर ठेवले आहेत. महापालिकेची गाडी दिसताच सदर टायर लगेच आतमध्ये घेतले जात आहेत. रिचफिल दुकानासमोर पार्किंग केला जात आहे. कोटक महिंद्रा बँकेने जनरेटर बसविला आहे. अग्रवाल आणि पंजाब टायर या दुकानदारांनी मार्जिनल स्पेसची जागा ग्रील लावून बंदिस्त करून तेथे टायर ठेवले आहेत. याशिवाय प्रमाणे अन्य टायरच्या दुकानदारांनी मार्जिनल स्पेसच्या जागेत आणि पार्किंगच्या जागेतच पंक्चर काढण्याचा व्यवसाय थाटला आहे. पुढे शीव सेंटर इमारतीतील सर्व दुकानदारांनी मार्जिनल स्पेसची जागा मोकळी सोडली असली तरी एव्हरेस्ट सायकल या दुकानदाराने या मार्जिनल स्पेसच्या जागेवर दोन्ही बाजूंनी ग्रील बसवून आत सायकली विक्रीसाठी आणि डिस्प्लेसाठी ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे अन्य इमारतींमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे.
दरम्यान, दुकानांसमोरील मार्जिनल स्पेस मोकळी करताना वाशीतील इमारतींसह नवी मुंबई शहरातील अन्य मोक्याच्या जागांवरील इमारतींमध्ये सिडको वा महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठया प्रमाणात वापरात बदल अर्थात रहिवाशी वापराचा वाणिज्य वापरात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल 2 ते 3 मजल्यांपर्यंत कार्यालये, रुग्णालये आणि क्लासेस चालविले जात आहेत. याकडे मात्र महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. मार्जिनल स्पेसच्या जागेतील अतिक्रमणावरील कारवाईमध्ये भेदभाव होत असल्याने व्यवसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीच लक्ष घालू सर्वांना समान न्याय या तत्वाने कारवाई करण्यास महापालिका अधिकार्यांना भाग पाडावे, अशी मागणी व्यवसायिकांकडून केली जात आहे.