नवी मुंबईः कोणत्याही गुणवत्तेचा निकष न ठेवता येईल त्याला प्रवेश देणार्या एनआरबी एज्युकेशनल, सोशल आणि कल्चरल ट्रस्ट संचालित नेरुळ सेक्टर-12 मधील शिक्षण प्रसारक विद्यालयचा यावर्षी 10वी परीक्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण प्रसारक विद्यालय या गरीब विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याने या शाळेचे नवी मुंबईमध्ये आगळे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.
दहावी परीक्षाचा निकाल 100 टक्के लावण्यासाठी अनेक शाळा फक्त गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींनाच प्रवेश देतात. 9वी मध्ये अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनींना नापास केले जाते. मात्र, शिक्षण प्रसारक विद्यालयमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींना कोणत्याही अग्निदिव्यातून जावे लागत नाही. गुणवत्तेचा कोणताही निकष न लावता शिक्षण प्रसारक विद्यालयमध्ये प्रवेश दिला जातो. कमी मार्क पडल्यामुळे अनेक शाळांनी तडीपार केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना देखील शिक्षण प्रसारक विद्यालय सामावून घेते. त्यामुळे गोरगरीब आणि सामान्य विद्यार्थी-विद्यार्थीनींची शाळा म्हणून शिक्षण प्रसारक विद्यालयाचा नवी मुंबई परिसरात लौकिक आहे.
विनानिकष प्रवेश या आणीबाणीच्या परिस्थितीत शिक्षण प्रसारक विद्यालयचा यावर्षी 10वी परीक्षाचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे एनआरबी एज्युकेशनल, सोशल आणि कल्चरल ट्रस्टचे अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.