आमदार संदिप नाईक यांचा घणाघात
नवी मुंबई : दिघावासियांच्या घरांबाबत शिवसेना स्वार्थी राजकारण खेळत आहे, असा घणाघात आमदार संदीप नाईक यांनी केला आहे. ही घरे नियमित करण्याचे राज्य शासनाने घर बचाव संघर्ष समितीला दिलेले आश्वासन पाळले नाही तर सोमवारनंतर रहिवाशांचे आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा आमदार नाईक यांनी दिला आहे.
घरांना नियमित करण्याबाबत ठोस भुमिका न घेणार्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर आज संतप्त दिघावासियांनी मोर्चा नेवून ठिया आंदोलन केले. आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक हे नेते पिडीत रहिवाशांसोबत होते. या त्रस्त रहिवाशांना भेेटण्याचे साधे सौजन्यही पालकमंत्री शिंदे यांनी दाखविले नाही. शिंदे हे ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री आहेत. मंत्रीमंडळात कॅबिनेटमंत्री आहेत. सर्वसामान्य आणि गरीब गरजू दिघावासियांची घरे नियमित करण्यासाठी सुयोग्य धोरणाकरीता त्यांनी ठोस भूमिका आतापर्यत कधीच घेतली नाही. त्यांना या प्रकरणी केवळ राजकारण करायचे आहे, अशी टिका आमदार नाईक यांनी केली आहे. पालकमंत्री शिंदे यांनी दिघावासियांच्या हिताची यापूर्वीच बाजू मांडायला हवी होती. मात्र त्यांनी तसे केले नाही. तातडीने धोरण तयार करुन दिघा वासियांची घरे सरकारने नियमित करावीत आणि सुमारे २५ हजार नागरिकांना बेघर होण्यापासून वाचवावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. मात्र शिवसेना आणि भाजपाला हे करायचे नाही. जनतेचा आणि मिडीयाचा दबाव वाढला की फक्त मोर्चे काढायचे, सत्कार करुन घ्यायचे आणि श्रेयासाठी पुढे पुढे करायचे एवढेच या पक्षाच्या नेत्यांना माहित आहे, असा टोलाही आमदार नाईक यांनी हाणला आहे.
दिघावासियांच्या बाबतीत शिवसेनेची दुटप्पी भुमिका वेळोवेळी समोर आली आहे. दिघ्यातील विनापरवाना बांधकामावर काय कारवाई केली? असा प्रश्न विधानसभेत विचारुन शिवसेनेचे मुंबईतील आमदार सदा सरवणकर आणि तृप्ती देसाई यांनी या रहिवाशांच्या जखमेवर मिठ चोळले होेते.
दिघावासियांची घरे वाचावीत यासाठी आमदार संदीप नाईक यांनी वेळोवेळी विधानसभेत जोरदार आवाज उठविला आहे. दिघा घर बचाव संघर्ष समितीसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. राज्यपालांना देखील याविषयी साकडे घातले आहे. दिघा वासियांनी आतापर्यंत काढलेले मोर्चे आणि आंदोलनांप्रसंगी ते या सर्वसामान्य रहिवाशांसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत.