आमदार संदीप नाईक यांनी फाडला शिवसेनेचा बुरखा
नवी मुंबई : दिघ्यातील घरांवर कारवाई करावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारे कोण आहेत? तसेच पालिकेच्या दिघा येथील पोटनिवडणुकीत कोणाच्या बाजूने उघडपणे प्रचार करीत होते हे दिघावासियांना आणि जनतेला चांगलेच ठाउक आहे असे सांगून दिघाप्रश्नी सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार्या शिवसेनेचा सडकून समाचार घेत आमदार संदीप नाईक म्हणाले की दिघावासियांच्या घरांवर कारवाईस विलंब का? असा प्रश्न विधानसभेत विचारणारे तृप्ती सावंत आणि सदा सरवणकर हे दोघे शिवसेनेचेच आमदार होते. त्यामुळे आज पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आरोप करणार्या शिवसेनेमध्ये नैतिकता राहिली नसल्याचा प्रहार आमदार नाईक यांनी केला आहे.
आमदार विद्या चव्हाण या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषदेतील सदस्या आहेत. मी विधान सभेत आणि आमदार चव्हाण यांनी विधान परिषदेत दिघा वासियांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील आहोत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर त्रस्त दिघावासियांनी नेलेला मोर्चा ही एक उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. डोक्यावरील घराचे छप्पर जाणार या भितीने त्यांच्या वतीने प्रगट झालेला तो एक आक्रोश होता. त्यामुळे या मोर्चाला नाटक असे संबोधने म्हणजे या रहिवाशांची चेष्टा आणि थटटा करण्यासारखे असल्याचा संतापही आमदार नाईक यांनी व्यक्त केला आहे. कॅम्पाकोलाला एक न्याय आणि दिघा वासियांना दुसरा न्याय, असा अन्याय का? असा प्रश्न या रहिवाशांचा आहे. राज्य सरकारने दिघा घर बचाव संघर्ष समितीला आश्वासन देवूनही दिघ्यातील घरे नियमित करण्याचे धोरण अद्याप उच्च न्यायालयात सादर केलेले नाही.दिघावासियांची घरे नियमित करण्यासाठी आमच्या पक्षाचे आमदार पाठपुरावा करीत आहेत आम्हाला दुसर्यांची मदत घेण्याची गरज लागत नाही, असा टोला देखील आमदार नाईक यांनी सेनेला हाणला आहे. गेले वर्षभर मी दिघावासियांना न्याय मिळावा म्हणून विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही प्रसंगी रस्त्यावर देखील उतरुन प्रयत्शील आहे. तेव्हा हे शिवसेनेचे नेते कुठे होते? असा सवाल आमदार नाईक यांनी विचारला आहे. जनतेचा दबाव वाढला की श्रेयाचे राजकारण करण्यासाठी पुढे यायचे, काम न करता बॅनरबाजी करायची, अशी शिवसेनेचे स्वार्थी भुमिका आहे. घनसोली नोड हस्तांतरित करण्यास आमचा विरोध नाही. मात्र हा नोड हस्तांतरित करताना सिडकोने सुविधांसह आरक्षित भुखंड विकसीत करुन तो हस्तांतरित करायला हवा. सिडकोने या नोडचे विकासशुल्क वसूल केले आहे त्यामुळे महापालिकेने आणि पर्यायाने नवी मुंबईकरांवर त्याचा भुर्दंड का पडावा? असे आमदार नाईक म्हणाले. आमदार नाईक यांनी सिडकोकडे पाठपुरावा केल्याने या नोडमध्ये विकासकामांना सुरुवातही झाली आहे.
दिघावासियांसाठी आमदार नाईक यांनी केलेला पाठपुरावा..
१९-८-२०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाअध्यक्ष हरिभाउ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, प्रधान सचिव, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लेखी पत्र दघावासियांची घरे नियमित करण्याची मागणी
१२-१०-२०१५ रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री फडणवीस, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पत्र दघावासियांची घरे नियमित करण्याची मागणी
४-१-२०१६ राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमत्री फडणवीस यांना लेखी पत्र दघावासियांची घरे नियमित करण्याची मागणी
१६-१२-२०१५ रोजी विधानसभेत लक्षवेधी मांडून दिघावासियांची घरे नियमित करण्याची मागणी