मुंबई : अब्जावधींच्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्यात नाव आल्यानंतर अडचणीच आलेले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आपण राज्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ दिलं नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळात 2001 ते 2009 मध्ये राज्यात अब्जावधींचा ऑनलाईन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट माजी आयएएस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केला आहे. या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील याचंही नाव घेण्यात आलं आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार सध्या जयंत पाटील अमेरिकेत असून एका पत्रकाद्वारे त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. दोन अंकी लॉटरीसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र एकच निविदा आल्यानं ती मंजूर करण्यात आली. सचिव किंवा लॉटरी आयुक्तांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यामुळे कविता गुप्ता यांना एकाच विभागात 7-8 वर्षे ठेवले, यावर मी भाष्य करणं संयुक्तित नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
या संपूर्ण आरोपांमध्ये लॉटरीसंबंधी केंद्रानं घालून दिलेले निकषांचं उल्लंघन करणं, एकाच कंपनीला ऑनलाईन लॉटरी चालवण्याचा ठेका देणं असे अनेक आरोप आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, लॉटरी संचलनालयाच्या तत्कालीन आयुक्त कविता गुप्ता आणि अनेक अधिकारी या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संपूर्ण गैरव्यवहारात दरवर्षी 25 ते 30 हजार कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. म्हणजेच 9 वर्षांत हा आकडा तब्बल 300 हजार कोटींपर्यंत जाऊन पोहोचतो.