राष्ट्रवादीचे दिघ्यातील नगरसेवक सभागृहात एकाकी
दिघ्याऐवजी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कँटीनचे आकर्षण
** अनंतकुमार गवई **
नवी मुंबईः दिघा मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात दिघावासियांना न्याय मिळावा म्हणून पोटतिडकीने बोलत असताना राष्ट्रवादीचे सर्वच जेष्ठ नगरसेवक कॅन्टींग मध्ये जेवण करण्यात मग्न होते, असे चित्र महापालिकेतील उपस्थितांनी पाहिले.
ठाणे-बेलापूर रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी दिघा परिसरातील 64 घरे आणि दुकाने हटविण्यात आली आहेत. या घरांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव 17 जून रोजी महापालिका महासभेच्या पटलावर आला असता या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. अपर्णा गवते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे-बेलापूर रस्ता रुंदीकरणासाठी 64 घरे पाडण्यात आली असून, फक्त 16 घरांचे पुनर्वसन होत आहे, असे अॅड. अपर्णा गवते यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रस्तावावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निवेदन महत्त्वाचे होते. मात्र, महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्तांना बोलू न देता प्रस्ताव मंजूर केला. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या या मनमानीला महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी कडकडून विरोध केला. त्यामुळे महापौर सुधाकर सोनवण यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन करण्यास परवानगी दिली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे निवेदन सुरु असताना राष्ट्रवादीचे सदस्य जेवायला निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेविका अॅड. अपर्णा गवते आणि नगरसेवक नवीन गवते यांनी आपले म्हणणे पोटतिडकीने मांडले. सर्वांना न्याय मिळतो, मग आम्ही काय अतिरेकी आहोत काय?, असा सवाल अॅड. अपर्णा गवते यांनी उपस्थित केला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या एकाही सदस्याने त्यांची बाजू उचलून धरली नाही.
दिघा मधील अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर मोर्चा काढणार्या राष्ट्रवादीची दिघावासियांबद्दल असलेली सहानुभूती बेगडी असल्याचे चित्र 17 जून रोजी नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत पाहायला मिळाले. ठाणे बेलापूर रस्ता रुंदीकरणात घरे पाडण्यात आलेल्या नागरिकांच्या स्थलांतराबाबत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात निवेदन करीत असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक जेवायला निघून गेले. त्यामुळे दिघा मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षरश: एकाकी पडले.