वाशी रेल्वे स्थानक परिसरातील नाल्यांची तातडीने पावसाळापूर्व सफाई करा
नगरसेविका फशीबाई भगत यांची मागणी
** अनंतकुमार गवई **
नवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानक परिसरातील सेक्टर-30 आणि 30 ए परिसरातील नाल्यांची पावसाळापूर्व कामांतर्गत सफाई करण्यात आली नाही. यामुळे सदर परिसरात नाल्याचे पाणी तुंबून पूरपरिस्थिती उद्भवण्याची भिती स्थानिक नगरसेविका फशीबाई भगत यांनी व्यक्त केली आहे.
वाशी रेल्वेस्थानक परिसरात मोठेमोठे मॉल असून अनेक कार्यालयीन इमारती देखील आहेत. यंदा जादा प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास सदरचा संपूर्ण परिसर जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतर्फे शहरातील महत्वाच्या नाल्यांची सफाई करून त्यामधील पाण्याचा अडथळा हटवण्यात आलेला आहे. परंतु, पावसाळापूर्व अडथळा हटवण्यात आलेला नाही. पासाळापूर्व कामे पूर्ण होवून बरेच दिवस झाले तरी वाशी, सेक्टर-30 आणि 30 ए परिसरात नाल्यांची तसेच पावसाळी गटारांची सफाई करण्यात आलेली नाही. यामुळे सदर परिसरात पाणी तुंबून पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नगरसेविका फशीबाई भगत यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात पाणी तुंबल्यास रेल्वे स्थानक परिसर, बस डेपो आणि लगतच्या मॉलमध्ये पूरपथ्स्थित निर्माण करू शकते. सदर बाब लक्षात घेवून फशीबाई भगत यांनी नाल्यातील पाण्याचा अडथळा हटवण्यासंदर्भात याआधीच महापालिका अधिकार्यांना सुचित केले आहे. तरीही सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात सदर परिसरात पाणी तुंबल्यास त्याला महापालिकेच्या अधिकार्यांनाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा देखील फशीबाई भगत यांनी दिला आहे.