नवी मुंबईः पावसाळ्यात रस्ते खचणे, अतिवृष्टीमुळे झाडे रस्त्यावर तुटून पडणे, दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे खारघर हिल परिसरात ‘सिडको’ने १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत या कालावधीत येणार्या पर्यटकांवर प्रवेश बंदी केली आहे. संपूर्ण नवी मुंबई, पनवेलचे विहंगम दृष्य दिसणार्या खारघर हिलवर किमान चार महिने तरी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘सिडको’ने सदर निर्णय घेतला आहे.
खारघर हिलवर सकाळी, संध्याकाळी जॉगिंगसाठी येणारा वर्ग मोठा असून खारघर, सीबीडी बेलापूरमधील रहिवासी या ठिकाणी रोज येत असतात. खारघर हिलच्या प्रवेशद्वाराजवळ ‘सिडको’च्या वतीने सुरक्षा चौका उभारण्यात आली आहे. सदर ठिकाणी दररोज सुरक्षारक्षक कार्यरत असतात. पावसाळ्यात खारघर हिलचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी येण्याचा मोह आवरता येत नाही.
मात्र, अगोदर घडलेले अपघात आणि पावसाळ्यात जमीन खचणे, मोठमोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार याठिकाणी होतात. दरम्यान, खारघरच्या सौंदर्यात भर घालत ‘सिडको’ने खारघर हिलची निर्मिती केली. सुमारे ५ कि.मी.चा डांबरी रस्ता ‘सिडको’ने या ठिकाणी बनवला आहे. तसेच विजेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्याचा फायदा सदर ठिकाणी असलेले आदिवासीपाडे, चाफेवाडी आणि फणसवाडी यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांचे जीवनमान सुधारले आहे.