* महापालिकेचा अतिक्रमण मोहीमेत पक्षपातीपणा
* नेरूळ विभाग अधिकार्यांची भूमिका संशयास्पद
नवी मुंबई : महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून नवी मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे धोरण नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अंगिकारले आहे. फेरीवाले हटविण्यात येवून मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणही हटविण्यात येवू लागले आहे. तथापि नेरूळमध्ये पालिका आयुक्त मुंढे यांच्या धोरणाला खुलेआमपणे हरताळ फासण्याचा एककलमी कार्यक्रम महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडून सुरू आहे. गोरगरीब फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करणारे महापालिका प्रशासन नेरूळ सेक्टर आठमधील चायनीजवाल्यांच्या अतिक्रमणापुढे शरणागती पत्करल्याप्रमाणे वागत असल्याच खुलेआमपणे पहावयास मिळते.
पालिका आयुक्त मुंढे आल्यापासून फेरीवाल्यांवर नेरूळमध्ये सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई संशयास्पद व दुटप्पीपणाची असल्याचा आरोप नेरूळवासियांकडून केली जात आहे. नेरूळ सेक्टर आठमधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समधील चायनीजवाले खुलेआमपणे आजही अतिक्रमणात मस्तपणा दाखवित महापालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे पहावयास मिळते. येथील चायनीजच्या अतिक्रमणाला नेरूळ विभाग कार्यालयाचा राजाश्रयच मिळाला असल्याचे पहावयास मिळते. एका चायनीजवाल्यांने तर सभोवताली अतिक्रमण करून बाजूच्या दुकानाकडे जाण्याचा मार्गच बंद केला आहे. या अतिक्रमणाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच राजकीय मंडळींनी विभाग अधिकारी कार्यालयाला कल्पना देवूनही चायनीजवाल्यांवर कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. सांयकाळी ७ नंतर खुलेआमपणे खुर्च्या सर्वत्र टाकून चायनीजवाले अतिक्रमण करत असतानाही नेरूळ विभाग कार्यालय कानाडोळा करत आहे. पालिका आयुक्त मुंढे यांच्या भूमिकेला छेद देण्याचे धाडस दाखवित नेरूळ विभाग कार्यालय चायनीजवाल्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत असल्याने पालिका आयुक्त मुंढे यांच्यापेक्षा नेरूळ विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीच मोठे असल्याचे उपहासात्मक चर्चा नेरूळवासियांमध्ये सुरू आहे. पालिका आयुक्त मुंढे यांनी साधेपणाने येवून या चायनीजवाल्यांच्या व्यवसायाची सांयकाळी सात-आठनंतर पाहणी केल्यास याच्या अतिक्रमणातील मुजोरपणा व नेरूळ विभाग कार्यालयाची अकार्यक्षमता त्यांना पहावयास मिळेल असा सूर स्थानिकांकडून आळविला जावू लागला आहे.