अनंतकुमार गवई
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात कंत्राटी पध्दतीने काम करणार्या मूषक नियत्रंण कामगारांचे प्रलंबित वेतन हा सावळागोंधळ आजही कायम आहे. जून महिना अर्धा उलटला तरी मूषक नियत्रंण कामगारांचे एप्रिल महिन्याचे अजून वेतन झालेले नाही.
गेल्या काही वर्षापासून मूषक नियत्रंण कामगारांची वेतनाबाबतची ससेहोलपट कायम आहे. तीन ते चार महिने वेतन नेहमीच मूषक नियत्रंण कामगारांचे विलंबानेच होत असते. शाळा सध्या सुरू झाल्या असून मुलांना गणवेश व शालेय साहीत्याची खरेदी करण्यास मूषक नियत्रंण कामगारांकडे पैसा नाही. महापालिका प्रशासनात काम करणार्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांचे वेतन नियमितपणे होत असताना केवळ मूषक नियत्रंण विभागाच्या कामगारांच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. महापालिका आयुक्त मुंढे यांनी याप्रकरणी लक्ष घालून मूषक नियत्रंण कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असा सूर मूषक नियत्रंण कामगारांच्या परिवाराकडून आळविला जात आहे.