नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिवहन उपक्रमाच्या कामकाजात आता विशेष लक्ष दिले असून कामकाजात अधिक सुरळीतपणा यावा याकरिता त्यांनी एनएमएमटी व्यवस्थापनाला मौलिक सूचना केल्या आहेत. घणसोली आगारातून जीसीसी तत्वावर बस प्रवर्तन सुरु करण्यात आले असून नजिकच्या काळात बस प्रवर्तनात वाढ होऊन प्रवाशांना अधिकाधिक चांगली आणि दर्जेदार बससेवा मिळणार आहे. त्याचप्रमाणे बहुचर्चित हायब्रीड बससेवेचे लोकार्पणही 13 जून रोजी करण्यात आले. सदर हायब्रीड बसेस वाशी रेल्वे स्थानक ते घणसोली आणि वाशी रेल्वे स्थानक ते महापे या मार्गावर धावणार आहेत. तर परिवहन उपक्रमाचे अतिशय कमी उत्पन्न असलेले 5 बसमार्ग बंद करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशान्वये कमी अंतराच्या मार्गावर केवळ प्रवाशी हितार्थ हात दाखवा व बस थांबवा अशी अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमाचे अधिकारीही अधिक सक्षमतेने काम करु लागल्याने त्याचा परिणाम म्हणून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात उत्पन्नात 50 लाख इतकी वाढ झालेली असून जून महिन्यामध्ये आजमितीपर्यंत उत्पन्नामध्ये
प्रतिदिन 3 लाखापेक्षा जास्त वाढ झाली आहे. तसेच जून महिन्याच्या 15 तारखेपासून विविध शाळा आणि कॉलेज सुरु झाल्यानंतर प्रतिदिन 6 ते 7 लाख इतकी वाढ अपेक्षित आहे. यामुळे परिवहन उपक्रम अधिक गतीमान होणार आहे. त्यादृष्टीने पहिल्याच दणक्यात ठोक मानधन आणि रोजंदारीवर काम करणार्या गैरहजर कर्मचार्यांना चाप बसणार आहे. जे कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर आहेत अशा ठोक मानधन अथवा रोजंदारीवरील 111 चालकांची आणि 103 वाहकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कर्मचार्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून इतर उपक्रमांनी देखील त्यांना कामावर न घेण्यास सुचविण्यात आहे.
याशिवाय परिवहन उपक्रमामध्ये कायमस्वरुपी कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर आहेत त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करुन त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये 10 चालक आणि 15 वाहकांचा समावेश आहे. तसेच जे कर्मचारी विभागीय चौकशीस उपस्थित राहणार नाहीत त्यांना घटनेचे कलम 311 (2 (ब)) अन्वये बडतर्फीची कारवाई करण्याबाबत वर्तमानपत्रामध्ये नोटिस देऊन कळविण्यात येऊन त्यांच्या बडतर्फीची कारवाई चालू आहे. यापुढे 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस जे अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर आळा बसून गैरहजेरीचे प्रमाण कमी होणार आहे.
पर्यवेक्षकीय कर्मचार्यांची कामाप्रती असलेली भावना वाढीस लागण्यासाठी जे कामचुकार कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असून सहाय्यक वाहतूक निरीक्षक संवर्गातील एका कर्मचार्याचे निलंबन अअणि 3 कर्मचार्यांच्या खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बस प्रवर्तनात वाढ झाली असून प्रवाशांना वेळेत बससेवा मिळत आहे. प्रवाशांच्या तक्रारीचा जलद गतीने निपटारा करुन पुढील काळात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी लवकरच मोबाईल अॅपद्वारे बसेसचे वेळापत्रक उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी करावयाची बसेस दुरुस्तीबाबतची सर्व कामे ज्यात वायपर दुरुस्ती, गळणार्या बसेसची दुरुस्ती, खिडक्या, हेडलाईट यांच्या दुरुस्तीची सर्व कामे करण्यात आलेली आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी प्रवाशांसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्र. 18002674747 उपलब्ध करुन दिला आहे.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्यास विविध रेल्वे स्थानकातून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आगामी काळात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार परिवहन उपक्रम ना नफा-ना तोटा या तत्वावर चालेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून परिवहन उपक्रमाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.