नवी मुंबईः दिघावासियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असून त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. दिघावासियांच्या भावनांशी खेळत राजकारणासाठी सैराट झालेल्या राष्ट्रवादीच्या ताई-भाईंनी विधीमंडळ सभागृहात दिघ्यातील अनधिकृत बांधकामांची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करावी, असे आव्हान नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिले आहे.
उच्च न्यायालयाने दिघ्यातील सर्व अनधिकृत इमारतीतील घरे खाली करण्याचे आदेश देत ते बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. न्यायाल्याच्या निर्णयामुळे दिघ्यातील अनधिकृत इमारतीमध्ये राहणार्या सुमारे 25 हजार रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात रस्त्यावर राहण्याची वेळ ओढवली आहे. दिघावासियांना न्याय मिळावा म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आणि आ. संदीप नाईक यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी विजय चौगुले यांनी दिघ्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे राजू मिश्रा यांना पैसे देवून पुढे केले आहे, अशा आ. विद्या चव्हाण यांनी केलेल्या आरोपाचे यावेळी खंडन केले. राजू मिश्रा काँग्रेसचा जिल्हा प्रवक्ता आहे. तसेच त्याला पत्रकारितेत नाईकांच्याच प्रायोजिक केबल चॅनेलने आणले. असे असताना चोरांच्या उलट्या बोंबा मारत दिघ्याच्या नागरिकांच्या भावनांचा खेळ राष्ट्रवादी खेळत आहे. दिघावासियांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असून आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे विजय चौगुले यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डावखरेंचा पराभव झाल्यानेत्याचा जाब पक्षश्रेष्ठींने विचारताच राष्ट्रवादीचे ताई आणि भाई सैराट झाले आहेत. पक्षश्रेष्ठींना काही तरी दाखविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे नाटक त्यांनी केले. दिघावासियांची जर राष्ट्रवादीच्या आमदारांना एवढी काळजी असेल तर त्यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात दिघ्यातील अनधिकृत बांधकामांबाबत सीआयडी चौकशीची मागणी करावी, असे आव्हान विजय चौगुले यांनी आ. विद्या चव्हाण आणि आ. संदीप नाईक यांना दिले आहे.