मुंबई : मुंबईत अंधेरी पश्चिमेला एका मेडीकल दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. एक महिला या आगीत भाजली असून तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला आधी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वायरलेस रोडवरील विघहाम मिस्त्री चाळीत वाफा मेडीकल स्टोअर हे दुकान आहे. दोन मजली इमारतीत तळ मजल्यावर दुकान आणि वरच्या मजल्यावर रहिवासी रहात होते. गुरुवारी सकाळी ६.२० च्या सुमारास मेडीकल दुकानात आग भडकल्यानंतर वरच्या मजल्यापर्यंत ही आग पसरली.
वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये १० ते १५ जण रहात होते. अत्यंत दाटी-वाटीची जागा असल्यामुळे आग लागल्यानंतर सर्वांना लगेच खाली उतरता आले नाही. त्यामुळे काही जणांचा भाजून तर, काहींचा गुदमरुन मृत्यू झाला. या आगीत एकाच कुटुंबातील चार ते पाच जण ठार झाल्याची शक्यता आहे.