- मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरच्या कळवा-सालसेट पारेषण यंत्रणेचा टॉवर मंगळवारी रात्री कोसळल्याने मंगळवार व बुधवारी दिवसभर विक्रोळी, वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, बोरीवली, मालाड आणि कुर्ला या भागांत टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यात आले. दुरुस्तीचे काम होण्यासाठी किमान पाच दिवस लागणार असल्याने तोवर मुंबईकरांना रोज भारनियमनाचा जाच सहन करावा लागणार आहे. सदैव झगमगणाऱ्या मुंबईत प्रथमच सुमारे आठवडाभर भारनियमन होणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, रिलायन्स, टाटा पॉवर व महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. कळवा-सालसेट येथील पारेषण वाहिनीवरून वीज मुंबईत येते. त्यानंतर वीजवितरण कंपन्यांमार्फत शहर व उपनगराला वीजपुरवठा होतो.
मुंबईत मंगळवारी रात्री कळवा-सालसेट दरम्यानच्या पारेषण वाहिनीचा टॉवर कोसळला. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून बोरीवली, मालाड, गोरगाव, कांदिवली आणि अंधेरी येथे भारनियमन सुरू झाले. त्यानंतर मुंबईत पुढील पाच दिवस भारनियमन होईल, असे उपनगरात वीज पुरवणाऱ्या रिलायन्स व टाटा पॉवरतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले.
>या भागांत भारनियमन
पश्चिम उपनगरातील बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका तसेच कुर्ला या भागांत पुढील पाच दिवस भारनियमन होणार आहे.
टाटा पॉवर काय म्हणते?
कळवा-सालसेट वीज वाहिनी क्रमांक ३ व ४ चा टॉवर मंगळवारी रात्री कोसळला. या टॉवरजवळ कचरा टाकला जातो. त्यातून निर्माण होणाऱ्या मिथिन गॅसने टॉवर गंजला आणि कचरा टाकायला येणाऱ्या लोकांनी टॉवरचा संरचनात्मक भाग काढून टाकल्याने टॉवर पडल्याची शक्यता आहे. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.