निलंबित डॉक्टरच्या स्वाक्षरीने रुग्णांना रक्त, इतर तपासण्यांचे रिपोर्ट
नवी मुंबई: कोपरखैरणे आणि घणसोली भागातील दोन पॅथॉलाजी लॅब चालकांनी न्यायालयाने निलंबनाची कारवाई केलेल्या एम.डी. डॉक्टरच्या स्वाक्षरीने रुग्णांना रक्त आणि इतर तपासण्यांचे रिपोर्ट देऊन त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ंकल्प क्लिनिकल लॅबोरेटरीज आणि आयुष पॅथ लॅबस अशी दोन पॅथॉलाजी लॅबची नावे असून कोपरखैरणे पोलिसांनी सदर दोन्ही लॅबच्या मालकांंवर फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन दोन्ही लॅब मालकांना अटक करण्याची कारवाई केली आहे. सदर दोन्ही पॅथॉलॉजी लॅबने अशा पद्धतीने शेकडो रुग्णांना खोटे तपासणीचे खोटे रिपोर्ट दिल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.
रुग्णांशी संबंधीत असलेले रक्त आणि इतर आजारांशी संबंधीत तपासण्या करणाची एम. डी. पॅथॉलॉजीस्ट पदवी असलेल्या डॉक्टरने प्रत्यक्ष लॅबमध्ये हजर राहून तपासणी केल्यानंतरच रुग्णांना त्याबाबतचे रिपोर्ट देणे आवश्यक आहे. मात्र, घणसोलीतील संकल्प क्लिनिकल लॅबोरेटरीज आणि कोपरखैरणेतील आयुष पॅथ लॅबस या दोन्ही पॅथॉलॉजी लॅबमध्ये प्रत्यक्ष एम. डी. पॅथॉलॉजीस्ट डॉक्टर नसताना त्यांच्या नावाने लॅबमधील इतर कर्मचार्यांनी शेकडो रुग्णांच्या रक्तासह इतर तपासण्या करुन खोटे रिपोर्ट दिल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही लॅबने हायकोर्टाने निलंबनाची कारवाई केलेल्या डॉ. सुर्यनाथ त्रिपाठी यांच्या सह्या असलेले तपासणी रिपोर्ट अनेक रुग्णांना दिल्याचे तपासात आढळून आहे. एम.डी. पॅथॉलॉजीस्ट असलेले डॉ.त्रिपाठी यांचे लायसन्स हायकोर्टाने नुकतेच ४५ दिवसांसाठी रद्द केले आहे. त्याचा कालावधी ३० मे ते १५ जुलै असे असतानाही घणसोली आणि कोपरखैरणेतील संकल्प क्लिनिकल लॅबोरेटरीज आणि आयुष पॅथ लॅबने डॉ. त्रिपाठी यांच्या नावाने रुग्णांना रक्त, लघवी आणि इतर तपासण्या केल्याचे रिपोर्ट दिल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथोलॉजीस्ट ऍन्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी गत पंधरा दिवसापूर्वी सदर दोन्ही लॅबमध्ये बोगस रुग्णांना पाठवून त्यांच्या माध्यमातून विविध तपासण्या करुन घेतल्या. यावेळी दोन्ही लॅब मधील कर्मचार्यांनी तपासण्या करुन काही वेळामध्ये रुग्णांना डॉ. त्रिपाठी यांच्या सहीनिशी रिपोर्ट दिले.
गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही लॅबमधून रुग्णांना अशा प्रकारे खोटे रिपोर्ट देण्यात येत असल्याचे आढळून आल्यानंतर संघटनेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली होती. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन याप्रकरणात डॉ. त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या सहींचे खोटे तपासणीचे रिपोर्ट देणार्या दोन लॅब चालकांवर गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार सोनवणे, बसरा, पोलीस नाईक प्रदिप जाधव आदिंनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असता, या दोन्ही लॅबमध्ये प्रत्यक्ष एमडी पॅथॉलॉजीस्ट डॉक्टर नसताना लॅब मधील कर्मचारीच सर्व प्रकारच्या तपासण्या करुन रुग्णांच्या रिपोर्टवर डॉ. त्रिपाठी यांची डिजीटल सही करुन ते त्यांना देत असल्याचे आढळून आले. तसेच डॉ. त्रिपाठी सदर दोन्ही पॅथोलॉजी लॅब चालकांकडून आपल्या एका डिजीटल सहीचे पाच हजार रुपये घेत असल्याचे आढळून आले. रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर संकल्प क्लिनिकल लॅबोरेटरीज आणि आयुष पॅथ लॅबस या दोन्ही लॅबवर कारवाई करुन दोन्ही लॅब चालकांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी दिली. दरम्यान, नवी मुंबईतील इतर अनेक लॅब मधून सुद्धा रुग्णांना अशाच प्रकारे खोटे रिपोर्ट दिले जात असून त्याबाबत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथोलॉजीस्ट ऍन्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात येत आहेत.