मेथीने दिले महिन्यात सव्वा लाख
- देहूगाव : येलवाडी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ नामदेव गाडे यांनी अवघ्या ३० गुंठे क्षेत्रामध्ये ३०-३२ दिवसांत जवळपास खर्च जाऊन निव्वळ सव्वा लाखाचे उत्पन्न घेतले आहे.
- तरुणांना योग्य वेळी योग्य पीक घेतल्यास शेती कशी किफायतशीर होते, याचे चांगले उदाहरण माजी ग्रामपंचायत सदस्य गाडे यांनी घालून दिले आहे. गाडे यांनी पारंपरिक ऊस, कांदे, भुईमूग, बाजरी, गहू अशा पिकांना फाटा देऊन सुधारित वाणाच्या मेथीचे पीक घेऊन हे उत्पन्न मिळविले आहे. गेल्या काही वर्षात पाऊस कमी झालेला असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले असल्याने शेती करावी की न करावी, अशा द्विधा मन:स्थितीत गाडोरखे अनेक शेतकरी आहेत. मात्र, गाडे यांनी पारंपरिक, भरपूर पाण्यावर घेतली जाणारी पिके न घेता कमी दिवसांत कमी पाण्यावर येणारे मेथी हे पीक निवडले. त्यांनी ३० गुंठे क्षेत्रावर ६६ गादी वाफे तयार केले. या गादी वाफ्यांमध्ये ९० किलो सुधारित वाणाचे बी पेरले. बियाणासाठी त्यांना सुमारे १० हजार रुपये खर्च आला. पंधरा दिवसांनी एकदा औषध फवारणी करून अडीच हजार रुपयांचे शंभर किलो रासायनिक खत टाकले. यामुळे या भाजीला कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव न होता भाजी झपाट्याने वाढली व अवघ्या तीस ते बत्तीस दिवसांत मेथी काढणीयोग्य झाली. दरम्यानच्या काळात मेथीला मागणी वाढल्याने प्रती शेकडा किमान १५०० ते १८०० रुपये असा दर मिळाला. यामुळे सुमारे नऊ ते साडेनऊ हजार जुडी मेथी निघाली. सुमारे वीस हजार रुपये खर्च आला.
- चांगला बाजारभाव, पिकाचा कालावधी बदलून घेतलेले पीक, कमी पाणी व कमी खर्च या कारणांनी गाडे यांनी अवघ्या महिनाभरात सर्व खर्च जाऊन सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना पिकांची योग्य निवड, योग्य वेळ साधल्यास शेती कशी किफायतशीर होते, याचे उदाहरण घालून दिले. बागायती शेतीसाठी पाण्याला पर्याय नसला, तरी योग्य पाण्याचे योग्य नियोजन व योग्य पिकाची निवड, वेळेचे व्यवस्थापनाने शेती किफायतशीर ठरते, हे त्यांनी पटवून दिले आहे.