- नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए मधील पालिका शाळेच्या जवळील भूखंडावर पालिकेची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीवर कारवाई केली.
- पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. शहरातील रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणे हटविल्यानंतर आता शहरातील इतर अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. एकही अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे ते तत्काळ पाडून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन बांधकाम झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिकेच्या शाळेजवळील भूखंडावर परवानगी न घेता पाच मजली इमारत उभी केली होती. नेरूळ विभाग कार्यालयाने संबंधितांना नोटीस दिली होती. यानंतरही बांधकाम सुरू असल्याने पालिकेने इमारतीवर कारवाई केली.
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपायुक्त सुभाष इंगळे, साहाय्यक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड, नेरूळ विभाग अधिकारी उत्तम खरात यांच्या पथकाने जेसीबी, काँक्रीट क्रशर मशिनच्या साहाय्याने इमारत पाडली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्यासह ७० पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात केले होते. महापालिकेने शहरातील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास येताच त्यांना नोटीस दिल्या जात असून, त्यानंतरही काम सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.