नवी मुंबईः मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील फळे आणि भाजीपाला यावरील नियमन सरसकट उठविण्याची मागणी व्यापार्यांनी केली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापार्यांची मागणी मान्य न करता एपीएमसी मार्केटमधील व्यापारावर नियमन कायम ठेवल्यामुळे नवी मुंबईतील कांदा – बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केटमधील व्यापारी येत्या १२ जुलै २०१६ पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. या आंदोलनामध्ये राज्यातील विविध बाजार समित्या उद्या ११ जुलै पासूनच सहभागी होणार आहेत. शेतमालावरील नियंत्रण हटविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्व प्रथम व्यापार्यांनी आणि माथाडी कामगारांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, नंतर या निर्णयाचे व्यापार्यांनी स्वागत केले.
शेतमालावरील नियंत्रण हटविताना गुजरात राज्याच्या धर्तीवर सरसकट हटवा, अशी मागणी व्यापार्यांनी केली होती. मात्र, राज्य सरकारने फक्त एपीएमसी बाहेरील व्यापारावरील नियंत्रण हटवून एपीएमसीमध्ये व्यापार करणार्या व्यापार्यांवर नियंत्रण कायम ठेवले. अडत पूर्वी शेतकर्यांच्या पट्टीतून कापली जात होती. आता नवीन नियमानुसार अडत ग्राहकांकडून घ्यावी लागणार आहे. तोलई आणि लेव्ही सुद्धा ग्राहकांच्या माथी मारण्यात येणार आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये शेतमाल खरेदी करण्यासाठी ग्राहकच येणार नाहीत. ग्राहक रस्त्यावर माल घेणे पसंत करणार आहेत. परिणामी एपीएमसी मधील कांदा-बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केटमधील व्यापारी येत्या १२ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. पुणे, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी या बेमुदत संपात उद्या ११ जुलै पासून सहभागी होणार आहेत. जर एपीएमसी मधील व्यापार्यांचा संप चिघळला तर ऐन पावसाळ्यात स्वयंपाक घरात भाजीपाल्याचा दुष्काळ पडणार आहे.