महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा संकल्प
नवी मुंबईः नवी मुंबई या आधुनिक शहराला हागणदारी मुक्त शहर करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवश्यक प्रतिबंधक मोहिमा राबविण्याचे आणि नागरिकांना शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सर्वच ८ महापालिका विभाग कार्यालयांना तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाला दिलेले असून, त्यानुसार विशेष मोहिम राबविली जात आहे.
नवी मुंबई शहर हागणदारी मुक्त करण्याकरीता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यासाठी अनुदान देणे तसेच ज्या ठिकाणी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधणे शक्य नाही त्या ठिकाणी सामुदायिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय, ई-टॉयलेट बसविणे याबाबतचे धोरण नवी मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार महापालिकेमार्फत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामाकरीता पात्र लाभार्थ्यांना १७ हजार रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात येते.
या अनुदानामध्ये केंद्र सरकारमार्फत ४ हजार रुपये, राज्य शासनातर्फे ८ हजार रुपये आणि नवी मुंबई महापालिका तर्फे ५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. सदर अनुदान संबंधित लाभार्थ्याला दोन समान हप्त्यामध्ये बांधकाम सुरू करण्यापुर्वी आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वितरीत करण्यात येते. वैयक्तिक घरगुती शौचालय बांधकामाकरीता आत्तापर्यंत २२९२ इतके अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले असून, छाननी अंती १३८४ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ६२० अर्ज अपात्र झाले आहेत. यापैकी ४०३ वैयक्तिक घरगुती शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ४७७ वैयक्तिक घरगुती शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत एकूण ८४२ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला असून, २८७ लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन अभियानची घोषणा झाल्यापासून महापालिकेमार्फत २८ कंटेनर पध्दतीची सामुदायिक शौचालये बांधण्यात आली असून, त्यामध्ये २८० सिट्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय महापालिका तर्फे अत्यंत रहदारीच्या ठाणे-बेलापूर मार्गावर ८ आणि बेलापूर किल्ले गावठांण चौकाजवळ १ अशी ९ ई-टॉयलेट बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ४ सामुदायिक शौचालयांमध्ये ४० सिटस्, एका सार्वजनिक शौचालयामध्ये २० सिटस् बांधण्याचे काम तसेच नवीन ३ ई-टॉयलेट बसविण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.
सद्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी एकूण ४४८ सार्वजनिक शौचालये असून, त्यामध्ये ५२२७ सिटस् उपलब्ध आहेत. मे. शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत रबाळे (भीमनगर) येथे २० बैठकी सामुदायिक शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे रबाळे (भीमनगर) परिसर हागणदारी मुक्त होऊन स्वच्छ आणि निटनेटका झाल्याचे चित्र दिसत आहे.
मे. लुब्रिझॉल इंडिया प्रा. लि. यांच्यामार्फत तुर्भे विभागातील हनुमाननगर येथील फायझर रोड लगत आधुनिक पध्दतीचे शौचालय बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्यामध्ये ७ सिटस् उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याबाबत मे. शेल्टर असोसिएट्स, पुणे यांच्यासोबत महापालिकातर्फे करार करण्यात आला आहे. त्यानुसार मे. शेल्टर असोसिएट्स यांच्यामार्फत आत्तापर्यंत बेलापूर विभागातील रमाबाई आंबेडकर नगर येथील ३२ कुटुंबांशी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याचे करारनामे करण्यात आले असून, या शौचालयांची बांधकामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच ऐरोली विभागातील समता नगर येथील १०८ कुटुंबांशी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याबाबत करारनामे करण्यात आले असून, या शौचालयांची बांधकामे अंतिम टप्प्यात आहेत. या व्यतिरिक्त ऐरोली विभागातील ऐरोली नाका, देशमुखवाडी,साईनाथ वाडी, गणपती कॉलनी येथे आणि घणसोली विभागातील नोसिलनाका परिसरात वैयक्तिक घरगुती शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
महापालिका कार्यक्षेत्रात आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१५-१६ या अंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्रात ४ ठिकाणी आधुनिक पध्दतीचे सार्वजनिक शौचालय बांधण्याची कामे तसेच ऐरोली विधानसभा क्षेत्रात १ फिरते शौचालय बसविण्याचे काम निविदा प्रक्रियेत आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९ ठिकाणी स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत शहर विकास मंत्रालयाने शिफारस केलेले आधुनिक पध्दतीचे शौचालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी १ काम निविदा प्रक्रियेत आहे. या व्यतिरिक्त मे. रिलायन्स जिओ यांच्यामार्फत नवी मुंबईतील विविध १२ ठिकाणी महिलांकरीता आधुनिक पध्दतीची ‘शी टॉयलेट’ बांधणे प्रस्तावित आहे. महिलांसाठी आवश्यक सुविधांसह असणारी ‘शी टॉयलेट’ संकल्पना अत्यंत अभिनव असून, यामुळे महिलांना सार्वजनिक ठिकाणी भासणारी प्रसाधनगृहांची अडचण काही प्रमाणात दूर होणार आहे.नवी मुंबई महापालिका क्षेत्र ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आठही महापालिका विभाग कार्यालयांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, वैयक्तिक शौचालयांसाठी अनुदान योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दरम्यान, नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.