कार्यकर्ता हा शेवटी कार्यकर्ताच राहतो,
नेत्यासाठी भांडतो, नेत्यासाठी राबतो,
नेता विजयी व्हावा म्हणून
रात्रीचा दिवसही हाच करतो
याची अपेक्षा तरी काय असते?
माझा नेता निवडून यावा,
नगरसेवक, आमदार, खासदार बनावा
नेता हेच याचे दैवत असते,
नेत्याप्रतीच याचे आयुष्यही समर्पित असते.
निवडणूकीत झोपत नाही
दिवसा प्रचार व रात्रीचा पहारा करतो
नेता मात्र काय करतो?
निवडणूक झाली की त्याला
कार्यकर्त्याचा विसर पडतो.
कार्यकर्त्याचा फोन जरी आला
तरी हा उचलण्याची तसदी घेत नाही,
कार्यकर्त्याला गरज भासली तरी
नेता धावून येत नाही,
कार्यकर्ता मात्र याच समजात असतो की
माझा साहेब ‘बिझी’ असेल
कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो.
अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर
नेत्याचा माज असतो,
कार्यकर्ता राबतो म्हणून नेत्याचा
रूबाब असतो.
कार्यकर्त्याला नेत्याची सत्यता कळत नाही,
कारण डोळ्यावर नेत्याच्या प्रेमाची झापडं
लावलेली असतात.
निवडणुकीत सहजासहजी उपलब्ध होणारा नेता
निवडणूकीनंतर कार्यकर्त्यासाठी वेळ देत नाही.
कार्यकर्ता मात्र साहेबांच्या प्रेमात
भक्तीच्या महासागरात त्याचेच गोडवे गात असतो.
– सौ. स्वाती इंगवले
नेरूळ