- अमरावती :- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅन्ड सिरीया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेने अमरावती, मलकापूर, भुसावळ व जळगाव या चार प्रमुख रेल्वे स्थानकांसह शेगाव, शिर्डी येथील मंदीरे आणि शेगावचे न्यायालय बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी दिली आहे. सदर पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यभर अलर्ट जारी केला आहे.
‘हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणेचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना ५ आॅगस्ट रोजी प्राप्त झाले. अजमल कसाब हा चांगला माणूस होता, असा उल्लेखही या पत्रात आहे. इसिस संघटनने हे पत्र पाठविल्याचा उल्लेख असल्यामुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला ही माहिती दिल्यानंतर सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांची कसून चौकशी
रेल्वे स्थानकांंची कसून तपासणी सरू करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. शस्त्रांस्त्रांनी सज्ज असलेले पोलीस गणेवशात आणि नजरबाज पोलीस खासगी वेशात तैनात करण्यात आले आहेत. भुसावळ अंतर्गत असलेल्या मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे सुरक्षा बळाच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून शनिवारी सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. अमरावती शहर पोलीस दलाच्या कोतवाली पोलीसांनीही अमरावती रेल्वेस्थानकाची बारकाईने तपासणी केली. इसिसने पाठविलेल्या धमकीपत्रात औरंगाबाद, परभणी, अकोला, खामगाव येथील कार्यकर्ते याकामी नेमले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक व देवस्थान उडविण्याची धमकी देणाऱ्या इसिस कार्यकर्त्याकडे अेके-४७, बुलेटप्रुफ जॅकेट, जिवंत काडतुस असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मोदी, फडणवीस, हजारे, तोगडीयाही टार्गेट
इसिस संघटनेने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे, विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया यांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिल्या आहेत.
***
अमरावती रेल्वे स्थानक बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर असून लगेचच स्कॅनरमधून सामानाची तपासणी केली जात आहे.
सी.एस.पटेल
निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल, बडनेरा