नवी दिल्ली- मोबाईल सेवा बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेसाठी सज्ज होताना एअरटेलने नवीन पोस्टपेड योजना जाहीर केली आहे. यानुसार ११९९ रुपये एकदाच भरून अनलिमिटेड कॉल्स करता येतील आणि त्यासोबत थ्री-जी आणि फोर-जी डेटाही दिला जाणार आहे.
नव्या इन्फिनिटी योजनेंतर्गत १,१९९ रुपयांत ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी, राष्ट्रीय रोमिंगवर कॉल्स करता येणार आहेत. त्याबरोबर १०० एसएमएस दररोज आणि १ जीबी थ्री-जी आणि फोर-जी डेटा तसेच विंक म्युझिक व विंक मुव्हीज मोफत पाहता येतील, असे एअरटेलच्या पत्रकात म्हटले आहे. दुस-या एका योजनेत एअरटेल १,५९९ रुपयांत अमर्याद कॉल्स, दररोज १०० एसएमएस, ५ जीबी थ्री-जी आणि फोर-जी डेटा तसेच विंक म्युझिक आणि विंक मुव्हीज मोफत पाहता येतील. रिलायन्स जियो येणार असून त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांनी जोरदार तयारी केली असून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. रिलायन्स जियोने एलवायएफ हँडसेटमध्ये जियो सीमकार्ड राहणार असून ९० दिवसांसाठी मोफत अमर्याद फोर-जी इंटरनेट सेवा तसेच कॉल्स दिले जाणार आहेत.
उद्योगातील निरीक्षकांच्या मते, रिलायन्स जियोसाठी आधीच १५ लाख ग्राहकांनी नावे नोंदवली असून त्यामुळे रिलायन्स हायस्पीड डेटा खूप स्वस्त दरात देईल.