नवी मुंबई : प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होत असलेली हानी लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाला अत्यंत हानीकारक असलेल्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या विक्रेत्यांकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे.
या अनुषंगाने घणसोली विभागाचे सहा.आयुक्त दिवाकर समेळ यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक धडक मोहिम हाती घेण्यात आली होती. यामध्ये घणसोली विभागातील 5 दुकानांमध्ये आढळलेला 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येऊन त्या दुकानदारांकडून 25 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. सेक्टर4 घणसोली येथील चामुंडा किरणा ब्रदर्स, सेक्टर 3 घणसोली येथे राज ऑईल डेपो व भवानी मिठाई ड्रायफ्रुट, सेक्टर 5 घणसोली येथे गुलाब अँण्ड सन्स आणि सेक्टर 7 घणसोली येथील श्री क्षेत्रपाल या पाच दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी रु.5000/- प्रमाणे एकुण रु.25000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे वाशी विभाग कार्यालय क्षेत्रात विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत आशापुरा सुपर मार्केट सेक्टर 29, अंबिका फुट शॉप सेक्टर 26, न्यु भगवती सुपर मार्केट से. 28 या तीन दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी 5000/- प्रमाणे एकुण रु.15000/- इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधक मोहीमा हाती घेण्यात आल्या असून व्यापारी / विक्रेत्यांनी पर्यावरणाला हानीकारक असा 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आपल्या व्यवसाय ठिकाणी ठेवू नयेत तसेच नागरिकांनीही त्या वापरु नयेत असे आवाहन करण्यात येत आहे.