नवी मुंबई : वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेली विवाहिता सुमन नरेश दळवी (२५) प्रसुती झाल्यानंतर दोन दिवसाने मृत पावल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, सुमनचा मृत्यू महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मृत सुमनच्या नातेवाईकांनी केला आहे. तर सुमन दळवी हिला श्वसनाचा त्रास असल्यामुळे तिला प्रसुतीनंतर श्वसनाच्या उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, तेथे आयसीयुमध्ये बेड उपलब्ध नसल्याने तिला पुन्हा वाशीतील रुग्णालात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु असताना २४ ऑगस्ट रोजी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे महापालिका रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रशांत जवादे यांनी स्पष्ट केले आहे.
तुर्भे इंदिरानगरमध्ये राहणारी मृत सुमन दळवी २० ऑगस्ट रोजी वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. त्याच दिवशी सांयकाळी सुमनचे सिझरीन करुन प्रसुती करण्यात आली. सुमनने बाळाला जन्म दिल्यानंतर २२ ऑगस्ट रोजी महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमनला त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सुमनला मध्यरात्री जे.जे. रुग्णालायात नेण्यात आले. मात्र, तेथे अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नसल्याने तेथील डॉक्टरांनी सुमनला दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुमनच्या नातेवाईकांनी अनेक प्रयत्न केले. अखेर त्यांना दुसरा पर्यान न दिसल्याने नातेवाईकांनी सुमनला पुन्हा वाशी येथील रुग्णालयात आणले. यात पाच ते सहा तासाचा कालावधी गेला. त्यानंतर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सुमनला दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप सुमनच्या नातेवाईकांनी केला. नंतर डॉक्टरांवर दबाव आणल्यानंतर सुमनला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान २४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमनचा मृत्यू झाला. महापालिका डॉक्टरांनी सुमनला याचठिकाणी दाखल करुन तिच्यावर उपचार केले असते तर ती बचावली असती. मात्र, येथील डॉक्टरांनी तसे न करता सिझरीन ऑपरेशन झालेल्या
सुमनला मुंबईत उपचारासाठी पाठविले. या पाच ते सहा तासांच्या कालावधीत सुमनला उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. सदर सर्व प्रकाराला महापालिका रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप मृत सुमनच्या नातेवाईकांनी केला. तसेच तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला होता. पंरतु, रुग्णालय प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी सुमनचा मृतदेह ताब्यात घेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, याप्रकरणी महापालिका रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रशांत जवादे यांच्याशी संपर्क साधला असता, सुमन दळवी प्रथम ४ ऑगस्ट रोजी महापालिका रुग्णालयात श्वसनाच्या उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिला जे.जे.रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर सुमन पुन्हा घरी गेली. त्यानंतर ती २० ऑगस्ट रोजी प्रसुतीसाठी महापालिका रुग्णालयात दाखल झाली. यावेळी सुमनची प्रसुती झाल्यानंतर दोन दिवसाने पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, तेथे बेड उपलब्ध नसल्याने सुमनला पुन्हा महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर ठिकाणी उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. जवादे यांनी सांगितले. तसेच सुमनच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचेही डॉ. जवादे यांनी स्पष्ट केले.