नवी मुंबई : सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी वेगवेगळ्या विभागांत जाऊन नागरिकांसोबत सुसंवाद साधणार्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ’वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
या शनिवारी दि. २७ ऑगस्ट २०१६ रोजी, महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे सकाळी ६.३० वा. महापालिका अधिका-यांसह कोपरीगाव तलावाजवळ, सेक्टर २६, वाशी येथे ’वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
याप्रसंगी ज्या नागरिकांना आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व सकाळी ६.०० वा. पासून तेथे उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त स्वत: नवी मुंबईकरांच्या भेटी घेवून समस्या जाणून घेत असल्याने नवी मुंबईकरांमध्ये तुकाराम मुंढेची लोकप्रियता कमालीची वाढीस लागली आहे. आजवरच्या अन्य आयुक्तांप्रमाणे वातानुकुलित कार्यालयात न बसता मुंढे नवी मुंबईच्या कानाकोपर्यात जावून नागरिकांच्या भेटी घेत असल्याने तसेच अतिक्रमण विरोधी मोहीम, मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण हटविणे यामुळे मुंढे हे कायमस्वरूपी महापालिकेचे आयुक्त असावे अशी उघडपणे नवी मुंबईकरांमध्ये चर्चा होत आहे.