नवी मुंबई: घरफोड्या करणार्या चोरट्यांनी तुर्भे गावात राहणार्या सचिन शिंदे यांचे बंद घर फोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार सचिन शिंदे तुर्भे गाव तलावाजवळील नवनाथ सोसायटीत राहण्यास असून २७ ऑगस्ट रोजी रात्री ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. मात्र, चोरट्यांनी हिच संधी साधुन २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील लॉकरमध्ये असलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सकाळी सचिन शिंदे घरी आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार केली.